दिल्लीसाठी भुसावळामार्गे धावणार ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’
जळगाव (प्रतिनिधी)-
लवकरच भुसावळामार्गे पुणे ते नवी दिल्ली दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. या वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे प्रवाशांना जलद प्रवासाचा अनुभव मिळेल. व्यावसायिक, पर्यटक आणि कुटुंबांसाठी हा उत्तम पर्याय ठरेल.
पुण्यातून लवकरच दिल्लीसाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. पुण्यातून निघणारी वंदे भारत स्लीपर १५८९ किमीचे अंतर २० तासांत पार करेल. या ट्रेनला भुसावळ स्थानकावर थांबा असेल. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना जलद प्रवासाचा अनुभव मिळेल. भुसावळहुन नवी दिल्लीचे अंतर १०९८ किमी असून जवळपास १३ तासात दिल्ली पोहोचेल. वंदे भारत स्लीपर ट्रेन १६० किमी प्रतितास वेगाने धावेल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानक येथून पुण्यासाठी निघणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन मथुरा, आग्रा कॅन्ट, ग्वाल्हेर, भोपाळ जंक्शन, खंडवा आणि भुसावळ या प्रमुख स्थानकांवर थांबेल. या ट्रेनमध्ये १६ डबे असतील, यात ११ एसी ३ टियर, ४ एसी २ टियर आणि १ फर्स्ट क्लास एसी बोगी असीतल.
एसी ३ टियरचे तिकीट २५०० रुपये इतके असेल. तर एसी २ टियरचे ४००० रुपये आणि फर्स्ट क्लास एसीचे ५००० रुपये असण्याची शक्यता आहे.
वंदे भारत स्लीपर नवी दिल्लीहून सायंकाळी ४:३० वाजता निघेल आणि रात्री १:०० वाजता पुणे जंक्शनवर पोहोचेल. परतीच्या प्रवासात पुण्याहून दुपारी ३:०० वाजता ही ट्रेन निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:३० वाजता दिल्लीला पोहोचेल. नवी दिल्ली आणि पुणे या दोन शहरांमध्ये प्रवास कऱणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे