बारावीत वैभवी देशमुखला ८५.१३ टक्के गुण
बीड (प्रतिनिधी)-
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. हत्येनंतर तपासासाठी आंदोलन, घरात लहान भाऊ, रडणारी आई, लढणारा काका असे चित्र असतानाही संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुखने बारावीला चांगला अभ्यास करत यश मिळविले आहे. आज बारावीचा निकाल लागला वैभवीला ८५.१३ टक्के गुण मिळाले.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यासह राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. फरार आरोपींना काही दिवस अटक झाली नाही. दररोज नाट्यमय घडामोडी घडत होत्या. वैभवी देशमुख आपले काका धनंजय देशमुख यांच्यासह खंबीरपणे उभी राहिली. लहान भाऊ आणि आईला सावरत ती आंदोलनातही सहभागी होऊन वडिलांसाठी न्याय मागत होती.
परीक्षेच्या काळातही वैभवी देशमुखचा संघर्ष आणि दौरे थांबलेले नव्हते. वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत हा लढा थांबविणार नाही, असा निर्धार केलेल्या वैभवीने परीक्षा दिली आणि चांगले यशही मिळवले आहे. तिचे हे यश पाहायला आज वडील असायला हवे होते, अशी भावना मस्साजोगचे ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.