पेपर तपासणीसाठी ‘एआय’चा वापर
सोलापूरः (प्रतिनिधी) –
‘ग्लोबर टीचर’ पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी सोलापूर जिल्हा परिषद शाळेच्या 225 विद्यार्थ्यांच्या उत्तरप्रत्रिका कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तपासून अंतिम निकाल लावल्याचा अभिनव प्रयोग केला आहे. या ‘एआय मॉडेल’मुळे शैक्षणिक क्षेत्रात क्रांती होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
डिसले म्हणाले, की यंदा उत्तरपत्रिका तपासून अंतिम निकाल तयार करण्यासाठी शिक्षकांकडे पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे ‘एआय’चा वापर करून उत्तरपत्रिका तपासण्याचा प्रयोग करण्यात आला. छोट्या गटावर करण्यात आलेल्या प्रयोगाचे निकाल उत्साहवर्धक आहेत. त्यामुळे हे ‘एआय मॉडेल’ सक्षम बनवण्यासाठी मदत होईल. यंदा आम्ही सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 12 शाळांच्या 225 विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेच्या उत्तरपत्रिका वर्गाचे शिक्षक व ‘एआय’च्या मदतीने तपासल्या. हार्वर्ड विद्यापीठातील इनोव्हेशन लॅबचे सहकार्य मिळाले. 25 ते 30 एप्रिल या कालावधीत या एआय मॉडेलची प्राथमिक चाचणी करण्यात आली. 20 गुणांची एक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांना सरासरी 1 मिनिट 42 सेकंद, तर 50 गुणांची उत्तरपत्रिका तपासण्यासाठी 5 मिनिटे 27 सेकंद एवढा वेळ लागतो; पण एआयने हेच काम अवघ्या 32 सेकंदांत पूर्ण झाले.
‘एआय’ने तपासलेल्या उत्तरपत्रिकांची अचूकता 95 टक्के एवढी आली; पण 5 टक्के विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर ओळखण्यात ‘एआय मॉडेल’ला अपयश आले. ‘एआय’ने 2 टक्के प्रश्न चुकीचे असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षणही या प्रयोगात नोंदवले. उत्तरपत्रिका तपासल्यानंतर ‘एआय मॉडेल’ने प्राप्त गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना कौशल्यवृद्धीसाठी 6 आठवड्यांचा ‘लर्निंग प्लॅन’ही दिला आहे.
डिसले यांनी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी ‘हॅक द क्लासरूम’ नामक ‘एआय मॉडेल’ तयार केले आहे. त्यांनी ‘गुगल जेमिनी’ची मदत घेतली आहे. हे मॉडेल मराठी भाषेतून प्रश्नपत्रिका तयार करणे व नंतर त्यांची तपासणी करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. ‘एआय’च्या मदतीने तपासलेल्या उत्तरपत्रिकांमधून 12 टक्के मुलांच्या गुणांत बदल झाल्याचेही या प्रयोगात निष्पन्न झाले. हे बदल संबंधित शिक्षकांच्या तपासणीत अचूक असल्याचे दिसून आल्याचे डिसले यांनी सांगितले.