नागरिकांच्या सोयीसाठी UIDAI कडून PVC आधार कार्ड जारी करण्यात आले होते. परंतु आता युआयडीएआयने, यापुढे पीव्हीसी आधार कार्ड्सना बाजारात मान्यता नसेल, हे सांगणारे ट्विट केले आहे. यामुळे ज्या लोकांनी बाजारातून किंवा शेजारच्या दुकानातून पीव्हीसी आधार कार्ड तयार करून घेतले असेल अशांचे आधारकार्ड अवैध असतील. आजच्या काळात आधारकार्ड हे महत्वाचे दस्तऐवज बनवले आहे. जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. त्यामुळेच, जर तुमच्याकडे सुद्धा हे पीव्हीसी आधारकार्ड असतील तर लगेचच नवीन आधारकार्डसाठी अर्ज करा.
‘हे’ पीव्हीसी आधारकार्ड का झाले अवैध ?
पीव्हीसी आधारकार्ड एटीएम कार्ड, ऑफिसचे ओळखपत्र किंवा इतर कार्ड्स प्रमाणे पाकिटात ठेवता येते. यामध्ये सुरक्षिततेसंबंधी अनेक फीचर्स असतात. जसं की, पीव्हीसी आधार कार्डमध्ये क्यूआर कोड स्कॅन करून आपली ओळख लगेचच पडताळणी जाऊ शकते. तर बाजारात किंवा जवळच्या दुकानात तयार केलेल्या पीव्हीसी आधार कार्डमध्ये या सर्व सुविधा नाहीत.
युआयडीएआयने दिली महत्त्वाची सूचना
युआयडीएआयने ट्विट करून, खुल्या बाजारातील पीव्हीसी आधारची प्रत न वापरण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. सुरक्षितता लक्षात घेऊन अशा पीव्हीसी कार्डचा वापर करू नये, असे आवाहन युआयडीएआयने नागरिकांना केले आहे.
#AadhaarEssentials
We strongly discourage the use of PVC Aadhaar copies from the open market as they do not carry any security features.
You may order Aadhaar PVC Card by paying Rs 50/-(inclusive of GST & Speed post charges).
To place your order click on:https://t.co/AekiDvNKUm pic.twitter.com/Kye1TJ4c7n— Aadhaar (@UIDAI) January 18, 2022
“बाजारातून तयार करवून घेतलेल्या पीव्हीसी आधारकार्डच्या प्रतीचे आम्ही समर्थन करत नाही. कारण यामध्ये कोणतीही सुरक्षा वैशिष्ट्ये नाहीत. तुम्ही जीएसटी आणि स्पीड पोस्टच्या शुल्कासह केवळ ५० रुपये भरून आपले नवे पीव्हीसी आधारकार्ड ऑर्डर करू शकता.” असे युआयडीएआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. फक्त uidai.gov.in वरून डाउनलोड केलेले आधार किंवा आधार पत्र, तसेच एम-आधार प्रोफाइल किंवा युआयडीएआयद्वारे जारी केलेले आधार पीव्हीसी कार्ड हे आधार कार्ड संबंधित कामासाठी वापरले जाऊ शकतात.