राजन साळवींच्या घरावर एसीबीची धाड पडताच मातोश्रीवरुन उद्धव ठाकरेंचा फोन

0
58

रत्नागिरी : वृत्तसंस्था

एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर सत्तेत सामील न होता उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहणारे राजापूर-लांजा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून (एसीबी) छापा टाकण्यात आला. एसीबीच्या तीन ते चार पथकांनी राजन साळवी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापा टाकला. एसीबीच्या या छापासत्राची माहिती अवघ्या काही क्षणांमध्ये बाहेर फुटली. ही बातमी मातोश्रीपर्यंत पोहोचतात उद्धव ठाकरे यांनी तातडीने राजन साळवी यांना फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला. राजन साळवी यांनी रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली तसेच आपण अटकेच्या कारवाईलाही तयार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, लाचुलचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी मी राहत असणारे सध्याचे घर, मूळ घर, हॉटेल आणि माझ्या भावाच्या घरावर छापा टाकला. एसीबीची चार ते पाच पथके यासाठी रत्नागिरीत दाखल झाली होती. सध्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या माहितीनुसार, एसीबीने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला अटकही होऊ शकते, मी त्यासाठी तयार आहे परंतु खंत वाटणारी गोष्ट म्हणजे एसीबीने माझी पत्नी आणि मोठ्या मुलावरही गुन्हा दाखल केला आहे.राजन साळवी कसा आहे, हे माझ्या कुटुंबातील लोक आणि मतदारसंघातील जनतेला माहिती आहे.त्यामुळे भविष्यात सरकारला या कारवाईचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा राजन साळवी यांनी दिला.राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण कोणत्याही कारवाईसाठी तयार असल्याचे संकेत दिले. एसीबीची धाड पडल्याचे समजताच उद्धव ठाकरे यांनी आपल्याला मोबाईलवर फोन केल्याचेही राजन साळवी यांनी सांगितले. माझ्या घरावर धाड पडल्याची माहिती समजली तेव्हा उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. त्यांनी माझी विचारपूस केली. राजन, संपूर्ण शिवसेना आणि महाराष्ट्र तुझ्या पाठिशी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी मला सांगितल्याचे राजन साळवी यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here