वरणगांव : प्रतिनिधी
परिसरात मंगळवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. तर यावेळी वीज कोसळल्याने शेतात काम करणाऱ्या सुसरी येथील दोन महिला जागीच ठार झाल्या तर दोन जण थोडक्यात बचावले. ही घटना वेल्हाळे शिवारातील शेतात दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली .
भुसावळ तालुक्यातील सुसरी येथील तुकाराम शामराव तळेले यांनी आपले वेल्हाळे शिवारातील शेत गावातीलच रविंद्र तळेले यांना नफ्याने पेरणीसाठी दिले आहे. त्यानुसार रविंद्र तळेले हे मंगळवारी आपल्या पत्नीसह इतर दोन महिलांना शेती कामासाठी घेवून गेले होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने ममता विनोद पाटील (वय ३३ ), मिनाक्षी रविंद्र तळेले (वय२८) या महिला शेतातील निंबाच्या झाडाखाली थांबल्या असता अचानक विज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुसरी गावचे पोलीस पाटील नितीन पाटील यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे सुसरी या गावात शोककळा पसरली आहे.
चौघा मुलांचं मातृछत्र हरपले
या दुर्घेटनेतील मयत ममता विनोद पाटील यांना निलेश (वय ७) व रुद्रा ( वय- अडीच वर्षे ) तर मिनाक्षी रविंद्र तळेले यांना राशी ( वय ११ ) व पाथर्व अशी दोन मुले आहेत.
सुदैवाने दोघे बचावले
विजांचा कडकडाट व पाऊस सुरु होण्यापूर्वी रविंद्र तळेले हे शेतात काम करीत होते. मात्र, शेतालगतच्या शेतकऱ्याने गवताचे ओझे उचलुन देण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले होते . तर दुसरी महिला वत्सला आनंदा तळेले (वय ५५) हि सुद्धा लगतच्या शेतात विजांचा कडकडाट व पाऊस सुरु झाल्याने तिकडेच थांबली. त्यामुळे ते दोघे बचावले.