जिल्हा रुग्णालयात दोन गटांकडून पुन्हा तोडफोड
जळगाव (प्रतिनिधी)-
भांडण झाल्यानंतर दोन्ही गटातील जखमी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. याठिकाणी ते पुन्हा समोरासमोर आल्याने पुन्हा वाद होवून हाणामारी झाली. त्यांनी जिल्हा रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केली. दरम्यान, त्यांना पोलिसांनी आवरले, मात्र त्यांनी पोलिसांनी देखील शिवीगाळ केली. ही घटना १४ एप्रिलरोजी मध्यरात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
याठिकाणी नियुक्त डॉक्टरांकडून या घटनेचा व्हिडीओ काढला जात होता, मात्र हल्लेखोरांनी त्यांचा मोबाईल हिसकावून आमचा व्हिडीओ काढता असे म्हणत त्यांना देखील शिवीगाळ केल्याचे व्हीडीओमध्ये कैद झाले आहे.
दोन्ही गटातील वाद वाढतच असल्यामुळे ड्युटीवर असलेले जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यांनी देखील भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडूनच पोलिसांसह डॉक्टरांना शिवीगाळ केली जात होती.
पोलिसांनी भांडण करणाऱ्यांपैकी राकेश पाटील (वय २८, आहुजानगर), गौरव बागुल (वय २८, रा. आंबेडकरनगर) व गणेश इंगळे (वय २८, रा. आंबेडकरनगर) या तिघांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. ड्युटीवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तक्रार देण्यास सांगितले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याने वरिष्ठांच्या आदेशानंतर तक्रार देवू असे म्हणत तक्रार देण्यास नकार देत, ताब्यात असलेल्यांना सोडून देण्याबाबत सांगितले.