जुन्या वादातून तिसऱ्याच्या रिक्षेत पिस्तूल ठेवणारे दोघे पकडले
जळगाव (प्रतिनिधी)-
एका रिक्षाचालकाकडून जिवंत काडतूस आणि पिस्टल शनिपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केली होती. तपासामध्ये जुन्या वादातून दोघंानी हे कारस्थान रचल्याचे उघडकीस आले आहे. दोघांना अटक करण्यात आली असून पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नेरी नाका परिसरात २८ मार्चरोजी दुपारी शनिपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी रिक्षाचालक राहुल रंगराव पाटील (रा. कुसुंबा) याच्याविरुद्ध कारवाई केली होती. त्याच्या रिक्षेत देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस आढळून आले होते.
त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून सत्य बाहेर काढले रिक्षाचालक राहुल पाटील यांच्यासोबत कुसुंबा येथील नितीन तायडे (वय २५) याचे वारंवार वाद होत होते. त्यामुळे राहुल पाटील याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी नितीन तायडे यानी कट रचला.
नितीन तायडे याने दुसरा संशयित आरोपी ऋषिकेश चित्ते (वय २०, रा.कुसुंबा) याच्या मदतीने गुन्ह्यात जप्त केलेले पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस २८ मार्चरोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास राहुल पाटील यांच्या रिक्षात ड्रायव्हर सीटच्या खाली स्टेपनी बॉक्समध्ये लपवून ठेवले. नंतर ऋषिकेश याने एका हॉटेलचालकापर्यंत ही माहिती पोहोच केली. हॉटेल चालकाचा मित्र पोलीस असल्याने त्याने माहिती दिल्यानंतर रिक्षाचालकावर कारवाई झाल्याचे तपासात दिसून आले
शनिपेठ पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयित आरोपी नितीन तायडे व ऋषिकेश चित्ते यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. दोघांविरुद्ध रिक्षा चालक राहुल पाटीलचे विरुद्ध खोटा पुरावा उभा केल्याचे कलम लावण्यात आले आहे. रिक्षाचालक राहुल पाटील याला न्यायालयाने जामीन दिला आहे. कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सपोनि साजिद मंसूरी, उपनिरीक्षक योगेश ढिकले, नाईक किरण वानखेडे, विकी इंगळे, रवींद्र साबळे यांनी केली.