जळगाव : प्रतिनिधी
जातीचे दाखले सरसकट मिळावेत, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मागता जातवैधता प्रमाणपत्र मिळावे यांसह इतर मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाजाचे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन येथे सुरू असून बुधवारी समाजबांधवांनी सुरत- नागपूर महामार्ग रोखला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी तीन किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बुधवारी पहाटेपासून उपोषणकर्त्या महिलांसह पुरुषांची प्रकृती बिघडली असून, त्यांनी उपचार करण्यास नकार दिला आहे.
आदिवासी कोळी समाजाचे पदाधिकारी जगन्नाथ बाविस्कर, नितीन कांडेलकर, संजय कांडेलकर, नितीन सपकाळे, पद्माकर कोळी, पुंडलिक सोनवणे, सुनीता कोळी, पुष्पा कोळी यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 ऑक्टोबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. जातीचे दाखले व जातवैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडून आडकाठी आणली जात असल्यामुळे बुधवारी 23 व्या दिवशी बांभोरी (ता. धरणगाव) येथील गिरणा नदीच्या पुलावर जिल्हाभरातील संतप्त समाजबांधव एकवटले. अखिल भारतीय कोळी समाजाचे प्रदेश सचिव अनिल नन्नवरे, प्रा. भाऊसाहेब सोनवणे, रणरागिणी संघटनेच्या मंगला सोनवणे यांच्या नेतृत्वात 42 मिनिटे रास्ता रोको आंदोलन करण्यात
आले.
आंदोलनामुळे धुळ्याच्या दिशेने पाळधीपर्यंत आणि जळगावच्या दिशेने खोटेनगरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, धरणगाव येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक उद्धव डमाळे, पाळधी पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक निरीक्षक सचिन शिरसाठ, उपनिरीक्षक संतोष पवार यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त होता. पोलीस अधिकाऱ्यांसमोर आंदोलनकर्ते प्रदेश सचिव नन्नवरे, मंगला सोनवणे यांनी समाजाच्या व्यथा मांडल्या.