मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्ताधीश कुणीही असो पण आजमितीला किंचितही विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही, असे मनसेने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधताना म्हटले आहे.
माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना देशभर अभिवादन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व अन्य सर्वच प्रमुख नेत्यांनी वाजपेयींना दिल्लीतील सदैव अटल समाधीस्थळी जावून पुष्पांजली वाहिली. मनसेने एका ट्विटद्वारे वाजपेयींना आदरांजली वाहिली. तसेच त्यांचा एक व्हिडिओ शेअर करत विद्यमान नरेंद्र मोदी सरकारवरही निशाणा साधला.
या व्हिडिओत वाजपेयी सत्तेचा मोह न धरता देशासाठी काम करण्याचा सल्ला देताना दिसून येत आहेत. सरकारे येतील आणि जातील, पक्ष बनतील व बिघडतील पण हा देश राहिला पाहिजे. या देशातील लोकशाही अबाधित राहिली पाहिजे, असे ते(बाजपेयी) म्हणत आहेत.
मनसेने संसदेतील खासदारांच्या निलंबनावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सत्ताधीश कुणीही असो पण आजमितीला किंचितही विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही. पण, ही अटलवाणी ऐकलीत तर कळेल की, हिंदुस्थानचं राजकारण कधीच राजकीय सूडबुद्धीने पेटलेलं नव्हतं पण, आज…? असा प्रश्न मनसेने विचारला आहे.