अमरावती : वृत्तसंस्था
दरवर्षी २३ सप्टेंबर आणि २१ मार्च हा विषुवदिन म्हणून ओळखला जातो. या दोन्ही दिवशी सूर्य विषुववृत्तावर असतो. त्यामुळे पृथ्वीवर दिवस-रात्र समान असते. उद्या शनिवारी ही स्थिती तयार होऊन समान दिवस-रात्र अनुभवता येणार आहे.
या दिवशी पृथ्वीचे दोन्ही गोलार्ध शनिवारी सूर्यापासून समान अंतरावर राहतात. या शिवाय अन्य दिवशी नेहमीपेक्षा लहान-मोठे राहत असल्याची माहिती येथील खगोल अभ्यासक प्रवीण गुल्हाने आणि विजय गिरूळकर यांनी दिली.
दिवस व रात्रीची असमानता पृथ्वीच्या आसाच्या कलन्यामुळे होते. पृथ्वीचा अक्ष हा २३.५ अंशाने कललेला आहे. जो गोलार्ध सूर्याकडे कलतो, त्या गोलार्धात दिवस १२ तासांपेक्षा मोठा व रात्र १२ तासांपेक्षा लहान असते. जेव्हा कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो, तेव्हा पृथ्वीवर दिवस व रात्र समान असते, पृथ्वीच्या परांचल गतीमुळे या दिवसाला दरवर्षात थोडाफार फरक पडू शकत असल्याचे त्यांनी सांगितले.
२१ मार्च, २२ किंवा २३ सप्टेंबर या दिवशी पृथ्वीचे दोन्ही गोलार्ध सूर्यापासून समान अंतरावर असतात. या दोन्ही दिवशी प्रकाशवृत्त उत्तर व दक्षिण धृवातून जाते म्हणून या दिवशी दिवस व रात्र समान वेळेची असते. आकाशात वैषुवीक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनिक छेदनबिंदू आहेत. त्यापैकी एका बिंदूतून २१ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो त्याला वसंत संपात बिंदू म्हणतात. तर त्याच्या विरुद्ध बिंदूत २२ किंवा २३ सप्टेबरला सूर्य प्रवेश करतो. त्याला शरद संपात बिंदू म्हणतात.
खगोलप्रेमींनी व भूगोलाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी २३ सप्टेंबरला प्रत्यक्ष कालमापन करावे व अनुभव घेण्याचे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.