वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील खाद्यसंस्कृती वेगवेगळी आहे. अनेक देशांमध्ये शाकाहारी खाण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र हल्ली दिसू लागले आहे. अनेक देशांमध्ये मासे आणि समुद्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या अन्नावर अवलंबून असलेल्याचे प्रमाण अधिक असल्याचे पाहायला मिळते मात्र तुम्हाला जगातील सर्वात महागडा पदार्थ लाखो रुपयांना मिळतो असे सांगितले तर नक्कीच विश्वास बसणार नाही ना? पण हे खरं आहे.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण जगातील सर्वात महागड्या पदार्थांची किंमत ही सोन्याहून ५० पट अधिक आहे. अल्मास कॅवियार असे या पदार्थाचे नाव आहे. या खाद्यपदार्थाचा वापर अनेक डिशमध्ये केला जातो.
कॅवियार म्हणजे काय?
कॅवियार काय असते हे आधी जाणून घेऊयात. सामान्यपणे लोक कॅवियारला माशांची अंडी आहेत, असे समजतात मात्र हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. एका वृत्तानुसार कॅवियार स्टर्जन माशाच्या अंडाशयामध्ये सापडणारी अंडी असतात. सगळ्या माशांच्या अंड्यांना कॅवियार म्हणत नाहीत. केवळ स्टर्जन माशांच्या अंड्यांनाच कॅवियार म्हणतात. कॅवियार चार वेगवेगळ्या प्रकारचे असते.अल्मास, बेगुला, ओस्सिएटर आणि सेव्रुगा असे कॅवियारचे ४ वेगवेगळे प्रकार आहेत. या सर्व कॅवियारचा रंग आणि चव वेगवेगळे असतात. या सर्व कॅवियारची किंमतही फार वेगवेगळी असते मात्र अल्मास कॅवियार हे सर्वात महागडंं असते.
एवढी किंमत का?
अल्मास कॅवियार हा जगातील सर्वात महागडा पदार्थ आहे. एक किलो अल्मास कॅवियारची किंमत ३४ हजार ५०० अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार एक किलो अल्मास कॅवियारसाठी २८ लाख ७४ हजार रुपये मोजावे लागतात. कॅवियारची किंमत अधिक असण्याचे कारण म्हणजे ते इराणी बेलुगा स्टर्जन माशापासून मिळवले जाते. बेलुगा कॅवियारची किंमत २० लाख रुपये प्रति किलो इतकी आहे. अल्मास कॅवियार केवळ अल्बिनो बेलुगा स्टर्न माशापासून मिळते. या माशाचं वय १०० वर्षांहून अधिक असते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या रिपोर्टनुसार, अल्मास बेलुगा स्टर्जन मासा हा इराणजवळच्या कॅस्पियन समुद्रात सर्वात स्वच्छ पाणी असलेल्या भागात आढळून येतो. ही फार दुर्मिळ प्रजाती आहे. अल्मास कॅवियार छोट्या मण्यांसारखे दिसते. कॅवियारची चव ही खारट अक्रोडासारखी लागते.
कॅवियारचे फायदे
‘क्लिवलॅण्ड क्लिनिक’च्या अहवालानुसार, कॅवियारमध्ये व्हिटॅमिन बी-१२ चे प्रमाण अधिक असते. यामुळे शरीरातील अंतर्गत क्रिया सुरळीत राहण्यासाठी मदत होते. व्हिटॅमिन बी-१२ मुळे थकवा दूर होण्यास मदत होते.कॅवियारमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्सचं प्रमाण अधिक असते. यामुळे बुद्धी तल्लख राहते. ओमेगा-३ फॅटी ॲसिड्समुळे डोक्यातील नसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि गरोदर महिलांसाठी फायद्याचे असते.कॅवियार मध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.त्यामुळे गंभीर आजार होण्यापासून संरक्षण मिळते.