साईमत लाईव्ह चाळीसगांव प्रतिनिधी
ब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडी परिसरात मागिल वर्षापासून सामाजिक वनिकरण विभागाच्या माध्यमातून पर्यावरणप्रेमी सोमनाथ माळी यांचे पुढाकाराने लोकसहभागातून वृक्षारोपण करण्यात आले आहे. मागिल वर्षी तेरा हेक्टर व चालू वर्षी दहा हेक्टर पडीक व ओसाड टेकड्या असलेल्या क्षेत्रालगत जवळपास पंचवीस हजार झाडांचे रोपण करण्यात आले आहे. हे क्षेत्र मागिल वर्षापासून चराईसाठी बंद केल्यामुळे झाडे, झुडपे,गवत मोठ्या प्रमाणात वाढीस येत आहे. मागिल वर्षी या ठिकाणी सेवा सहयोग फाऊंडेशन,पूणे व वेंडर लाईन कंपनी मार्फत गुणवंतदादा सोनवणे यांचे संकल्पनेतून एक गाव एक तलाव ही निर्माण करण्यात आला आहे. तसेच येथील झाडांना उन्हाळ्यात पाणी देता यावे यासाठी चार बोअरवेल्स ही करण्यात आले आहेत. या परिसरातच पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे ही या परिसरात चिंकारा जातीचे हरिण,रानडूक्कर,ससे,कोल्हे,लांडगे इ.वन्यप्राणी, तसेच गरुड,घार,टिटवी,चिमण्या इ.पक्षांचा मोठ्या प्रमाणात आधिवास वाढीला येत आहे. नैसर्गिक काटेरी झाडे, झुडपे,गवत वाढत असल्याने मधपोळे,फुलपाखरू, काजवे इ.ही परिसरात वाढीस येत आहेत. जैवविविधता वाढीस येत आहे.
या क्षेत्रात चिंकारा हरिण या राज्यपशूचा अधिवास वाढला असून यांचे कळप आजू बाजूच्या शेतात जातात व उभ्या पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान करतात तसेच यांच्या मागावर असलेल्या लांडग्यांनी तसेच जंगली कुत्र्यांनी अनेक शेळ्या,मेंढ्या,गाई-म्हशीचे वासर फस्त केले आहेत. परंतू शेतकरी बांधवही आपले झालेले नुकसान सहन करत आहेत. तसेच उन्हाळ्यात चाऱ्याच्या व पाण्याच्या शोधात असलेल्या कळपांमधील चिंकारा हरणांचा अपघातामुळेही जखमी होणे,मृत्यू होणे इ.घटना झालेल्या आहेत.
भविष्यात या परिसरात चिंकारा हरणांची संख्या वाढीस आल्यामुळे जंगली कुत्रे, लांडगे मोठ्या प्रमाणात वाढीस येऊ शकतात.या प्राण्यांसाठी या परिसरात सुरक्षित अधिवास व्हावा यासाठी काहीतरी उपाय योजना झाली पाहिजे अशी अपेक्षा ब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडीचे संकल्पक पर्यावरण प्रेमी सोमनाथ माळी यांनी केली आहे.