मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची काल अनौपचारिक भेट झाली. या भेटीची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील तिसरा घटक पक्ष काँग्रेसने यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ही भेट शुभ संकेत असल्याचे म्हटले.
शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. किंबहुना या भेटीदरम्यान कॉफी पिली आणि त्यात शरद पवारांनी साखर घातल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी कबुली दिली. यावर नाना पटोले यांनी शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट म्हणजे शुभ संकेत असल्याचे भंडाऱ्यात म्हटले. ज्यावेळी महाविकास आघाडीची बैठक होईल, त्यात यावर चर्चा होईल. प्रकाश आंबेडकरांनी जर ही चर्चा गोड झाल्याचे वक्तव्य केले असेल तर चांगलीच बाब असून चर्चा गोडचं व्हावी, अशी आमची अपेक्षा असल्याचं सूचक वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात केले.
काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीदेखील या भेटीचे स्वागत केले. मुंबईत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेली प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांची भेट ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. महाविकास आघाडीची पुढची सकारात्मक पावले पडण्याच्या दृष्टीने हा एक शुभ संकेत असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
पवार-आंबेडकर भेटीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण म्हणाले, माझी व्यक्तीगत इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी आणि महाविकास आघाडीने आगामी निवडणुकीमध्ये एकत्र आले पाहिजे. आज भलेही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा आंबेडकरांच्या भाषेमध्ये कॉफी पिण्याच्या निमित्ताने एकत्र आल्याचे संकेत त्यांनी दिले. जे काही असेल ते सकारात्मक आहे आणि आगामी काळामध्ये यातून एक संवाद सुरू होईल. पुढील काळात वंचित आघाडीला महाविकास आघाडी सोबत घेण्याच्या दृष्टीने काही चांगली सकारात्मक पावले पडावीत, अशी आपली इच्छा असल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉब्लेस्म ऑफ रुपी प्रबंधाला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांच्या विनंतीनंतर प्रकाश आंबेडकर, शरद पवार यांच्या भेटीला गेले. त्यावेळी काही वेळ शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये चर्चाही झाली. शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी थेट महाराष्ट्र सरकारवर हल्ला चढवला आहे.
इंडिया आघाडीबद्दल बोलणे नाही
प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की, आयोजकांनी चांगला कार्यक्रम घेतला. प्रॉब्लेम ॲाफ रुपी, या पुस्तकाला १०० वर्ष पूर्ण झाली. त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे मी आलो. कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांनी मला कॉफीसाठी बोलावले. शरद पवार देखील होते. आम्ही जवळपास १२ लोक होतो. आजच्या भेटीत इंडिया आघाडीबद्दल काहीच बोलणे झालेले नाही. ५ राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काही होईल, असंही वाटत नाही. तसेच, पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपाला असं वाटत असेल की, आम्ही त्यांच्यासोबत येऊ तर मी म्हणेन की, वाट बघत बसा.