सातारा : वृत्तसंस्था
देशभरात सध्या अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या भव्यदिव्य मंदिराची चर्चा सुरु आहे. अशातच साताऱ्यातही एका गावात गावकऱ्यांनी एकत्र येत एका रात्रीत मंदिर बांधले आहे. या मंदिराची आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरु झाली आहे.
सातारा तालुक्यात नागठाणे ग्रामस्थांनी एकत्र येऊन अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. साताऱ्याच्या नागठाणे जवळच्या चाहूर परिसरात असणारे रवळेश्वराचे मंदिर एका रात्रीत बांधून ग्रामस्थांनी हा अनोखा संकल्प पूर्ण केला आहे. नागठाणे गावापासून काही अंतरावरच झाडाझुडपात शंभू महादेवाचा अवतार असणाऱ्या रवळेश्वराची उघड्यावर असणारी मूर्ती गेल्या अनेक वर्षापासून पाहायला मिळत आहे. गावातील अनेक ग्रामस्थ या देवाच्या दर्शनासाठी आवर्जून येत असत. याविषयी ग्रामस्थांनी एकत्र येऊन या मूर्तीसाठी एक मंदिर बांधण्याचे नियोजन केले होते. गावकऱ्यांनी एका रात्रीत मंदिर बांधण्याचा निश्चय केला होता.त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास या मंदिराच्या पायाबांधणीला सुरुवात झाली आणि नागठाणेसह पंचक्रोशीतील ५०० ग्रामस्थांनी एकत्र येऊन या मंदिराची एका रात्रीत उभारणी केली.