मालेगाव : प्रतिनिधी
गिरणा सहकारी साखर कारखाना प्रकरणी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी बदनामी केल्याप्रकरणी मालेगाव न्यायालयात मंत्री दादा भुसे यांनी अब्रुनुकसानाची दावा दाखल केला होता. याप्रकरणाच्या सुनावणीला संजय राऊत यांनी आज (२ डिसेंबर) न्यायालयात हजेरी लावली. सुनावणीनंतर संजय राऊतांनी दादा भुसेंंवर हल्लाबोल केला आहे. संविधानाने मला चोराला चोर म्हणण्याचा अधिकार दिला आहे, असं म्हणत राऊतांनी भुसेंवर टीका केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत म्हणाले, “गिरणा सहकारी साखर कारखाना बचावच्या नावाखाली दादा भुसेंनी शेतकऱ्यांकडून १७८ कोटी रूपये गोळा केले. हे पैसे शेतकऱ्यांचे असून, त्याच्या पावत्याही आहेत. याचा हिशोब मागितला, तर आम्ही गुन्हेगार झालो का?”
काहीजण नोटीस आल्यानंतर
दुसऱ्या पक्षात पळून गेले
“संविधानाने चोराला चोर म्हणण्याचा आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचा मला अधिकार दिला आहे. संविधान, नियम मलाही माहिती आहेत. खटला दाखल केल्याने न्यायालयात आलो. आम्ही काय घाबरतो का? काहीजण नोटीस आल्यानंतर दुसऱ्या पक्षात पळून गेले. मालेगावचा लढवय्या योद्धा अद्वय हिरे तुरूंगात आहेत.अद्वय हिरेच मालेगावचे आमदार होतील,” असा विश्वास व्यक्त करत राऊतांनी
भुसेंवर टीकास्र डागले.
तर माफी कशाला मागायची
न्यायालयात माफी मागण्यास नकार दिला का? या प्रश्नावर संजय राऊतांनी म्हटले, “मी आयुष्यात कुणाचीही माफी मागितली नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. सत्य असेल तर माफी कशाला मागायची. आम्ही खोट्या भूमिका मांडत नाही. शेतकऱ्यांचा पैसा असून पुरावे आहेत. मग, माफी कुणाची मागायची? दादा भुसेंनी शेतकऱ्यांची माफी मागायला हवी.”
आपण केलेल्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही, असा प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “२०२४ नंतर ईडी, सीबीआय पोलीस सुमोटो तक्रार दाखल करून घेतील. आम्हाला जायचीही गरज पडणार नाही.”