वरणगाव : प्रतिनिधी
वरणगाव शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा दर्जा खालावल्यामुळे संपूर्ण योजनेचेच तीन तेरा वाजले आहेत. हा विषयच बाजूला आहे. तथापि, या योजनेचे काम ज्या ठेकेदाराला दिले आहे, त्या ‘अरिहंत’ च्या शहा नावाच्या ठेकेदाराने बँक ग्यारंटीच बोगस दिली आहे. तरीही शासनाचा पगार घेणारे जीवन प्राधिकरणाचे अधिकारी निकम, वरणगावचे शेख, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाचे पवार या तिघांनी संबंधित ठेकेदारासाठी पायघड्या घालून २५ कोटीच्या पाणी योजनेची वाट लावली आहे. ठेकेदाराने बॅँक ग्यॅरंटी बोगस सादर केली असल्याचे उघडकीस येवून देखील तरीही ठेकेदाराला हे तीन शासनाचे प्रतिनिधी पाठिशी घालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
वरणगाव नगरपरिषदेला महाराष्ट नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मंजूर पाणी पुरवठा योजनेच्या कामात मोठया प्रमाणात दिरंगाई सुरु आहे. या मंजूर योजनेेबाबत अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. मोजमाफ पुस्तिका (मेजरमेंन्ट बुक) वेगळयाच एसी नावाच्या ठेकेदाराची तर एक मोठे बिल दुसऱ्यांच म्हणजे अरिहंतला काम न करता दिले गेले असल्याचे समोर आले आहे. बॅँक गॅरंटी देखील बोगस सादर केली गेली असल्याचे सांगण्यात आले आहे. तीन बिले हे एसी च्या नावाने निघाले तर चौथे बिल काम न करता अरिहंतच्या नावाने काढण्यामागे अर्थपूर्ण गौडबंगाल असल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे जे काम सुरु होते त्या कामाचा दर्जा देखील खालावला असून पाणीपुरवठा योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. शासनाच्या नियमानुसार कोटयावधीचे काम करणारा ठेकेदाराने जर बोगस बॅँक ग्यॅरंटी सादर केली असेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये गुन्हा दाखल झाला पाहिजे होता, परंतू असे न करता उलट त्यांच अरिहंतला काम देवून त्याच्या नावाचे पेमेंट काढण्याची घाई निकम, शेख, पवार यांना लागलेली दिसते. जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालण्याची गरज आहे. ठेकेदार हा निकम,शेख,पवार यांचा जवळचा व्यक्ती तर नाही, पण केवळ आर्थिक कमाईचे साधन म्हणून हे तीन अधिकारी संबधित ठेकेदारावर कारवाई न करता पाठिशी घालत असल्याची चर्चा आहे.