जळगाव : प्रतिनिधी
तंबाखू मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी प्रशासन सरसावले असून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यांतर्गत सप्टेंबर २०२३ अखेर १०८ गुन्हे दाखल करण्यात आले असून १४३७ प्रकरणात २ लाख ८२ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तंबाखू मुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जिल्हा तंबाखू नियंत्रण व मौखिक आरोग्य समन्वय समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, समिती सदस्य राज मोहम्मद खान शिकलगर, अनिल गुंजे तसेच पोलीस ,आरोग्य, अन्न व औषध विभाग शिक्षण व विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तंबाखू नियंत्रण कायद्याबाबत विविध विभागांना सूचना दिल्या यामध्ये पोलीस, आरोग्य, अन्न औषध व शिक्षण विभागाने कोटपा- २००३ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. कलम ५ व कलम ७ अंतर्गत मासिक किमान १० कारवाई करण्यात याव्यात. शाळेच्या १०० यार्ड परिसरात असणाऱ्या पान टपरी, तंबाखू तथा तंबाखू विक्री केंद्रावर करवाई करून त्यांना तिथून हटविण्यात यावे. जीएसटी विभागामार्फत तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीचा मासिक अहवाल प्राप्त करून घेण्यात यावा.