charitable hospitals : धर्मादाय रूग्णालयांच्या नियंत्रणासाठी पथक – मुख्यमंत्री

0
8

धर्मादाय रूग्णालयांच्या नियंत्रणासाठी पथक – मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी)

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू ओढवल्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष पथक तयार करण्याचे निर्देश दिले.

महापालिका क्षेत्रात जागा आणि इतर सवलती घेणाऱ्या तसेच महसूल विभागाकडून जमीन सवलत घेणाऱ्या रुग्णालयाची यादी तयार करावी, अशा सूचना फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा आढावा घेण्यात आला. यावेळी फडणवीस म्हणाले, धर्मादाय रूग्णालयात १० टक्के खाटा निर्धन घटक तर १० टक्के खाटा दुर्बल घटकातील रूग्णांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. आपत्कालिन परिस्थितीत रूग्ण स्थिर होईपर्यंत तातडीचे उपचार आणि वैद्यकीय सेवा पुरविणे आवश्यक आहे. यासाठी रूग्णालयांनी कोणतेही अनामत रक्कम घेवू नये.

धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाने धर्मादाय योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी. धर्मादाय रुग्णालयावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती तयार करावी. केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विषयक योजनांच्या संलग्नीकरण तसेच समन्वयासाठी प्रयत्न करावेत. धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत विभागनिहाय स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी करणाऱ्या रूग्णालयांनी रूग्णांना दिलेल्या उपचाराची माहिती, रूग्ण, शिल्लक खाटा यांची माहिती ऑनलाईन प्रणालीत भरणे सक्तीचे करावे. समन्वयासाठी क्लस्टर तयार करून समिती प्रमुख नेमून माहिती न भरणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव ( वित्त) ओ.पी. गुप्ता, मदत आणि पुनर्वसन अतिरिक्त मुख्य सचिव सोनिया सेठी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्याच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, विधी आणि न्याय प्रधान सचिव सुवर्णा केवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती उपस्थित होते.

प्रत्येक धर्मादाय रुग्णालयात रूग्णांच्या योजना, आजार, उपचाराच्या माहितीचे मोठ्या अक्षरातील फलक लावावेत. या फलकामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना रिक्त खाटांची स्थिती, रुग्णालयात कार्यरत शासकीय योजना आणि इतर माहिती मिळण्यास मदत होणार आहे. सर्व माहिती ऑनलाईन प्रणालीवर टाकावी. याचे नियमित अद्ययावतीकरण होण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here