जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली.या मालिकेतील पहिला सामना आज (रविवारी) जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून दणदणीत पराभव केला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. या विजयात अर्शदीप-आवेश आणि साई-श्रेयसने मोलाचे योगदान दिले. मालिकेतील दुसरा सामना 19 डिसेंबरला गकबेराह येथे होणार आहे.
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विजयाने सुरुवात केली आहे. भारताचा या वर्षातील वनडेतील हा 26 वा विजय आहे. 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाने 26 सामने जिंकले होते. कांगारू संघाने 2023 मध्ये 30 सामने जिंकले आहेत. आफ्रिकन संघाचा पराभव करत भारताने मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. पाच वर्षांनंतर भारताने दक्षिण आफ्रिकेत वनडे जिंकली आहे.टीम इंडियाने शेवटचा 2018 मध्ये सेंच्युरियनच्या मैदानावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2022 मध्ये सलग तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता.
साई सुदर्शनचे शानदार पदार्पण
जोहान्सबर्गच्या न्यू वँडरर्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांचा संघ 27.3 षचकांत 116 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 16.4 षटकांत 117 धावा करत सामना जिंकला. भारताकडून पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनने नाबाद 55 धावा केल्या.त्याने 43 चेंडूंच्या खेळीत नऊ चौकार मारले. श्रेयस अय्यरने 45 चेंडूत 52 धावा केल्या. त्याने सहा चौकार आणि एक षटकार मारला. ऋतुराज गायकवाड पाच धावा करून बाद झाला. तिलक वर्मा एक धाव घेत नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून वियान मुल्डर आणि अँडिले फेहलुकवायो यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
आवेशची घातक गोलंदाजी
अर्शदीपसह आवेश खानची घातक गोलंदाजी पाहायला मिळाली. आफ्रिकेच्या डावातील 11व्या षटकात आवेश खानची हॅटट्रिक हुकली. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर एडन मार्करम आणि व्हियान मुल्डरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर आवेशने डेव्हिड मिलरला यष्टिरक्षक राहुलकडे झेलबाद केले. मिलरला दोन धावा करता आल्या. यानंतर त्याने केशव महाराज (25) याला बाद करत चौथी विकेट्स घेतली.