जुनी पेन्शनसाठी शिक्षकांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने
जळगाव (प्रतिनिधी )-
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित पदांवर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू असल्याचा आदेश देण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित पदांवर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अद्याप त्याबाबत प्रशासनाने अधिकृत आदेश काढलेला नाही. यामुळे संतप्त शिक्षकांनी आज जिल्हा परिषदेवर धडक देत आक्रमक घोषणांनी परिसर दणाणून टाकला.
शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की, न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही शासन आदेश काढण्यास उशीर करत आहे. जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. शिक्षकांनी प्रशासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
