लखनाैहून आणलेल्या 60 हजार कुत्ता गाेळ्यांचा साठा मालेगावमध्ये जप्त
नाशिक ( प्रतिनिधी ) –
उत्तर प्रदेशच्या लखनौमधून नशेच्या औषधांची तस्करी करत मालेगावात विक्रीचे रॅकेट चालवणारा भिवंडीचा संशयित माेहंमद अयाज निसार अहमद अन्सारी (४८) याला पवारवाडी पाेलिसांनी अटक केली.
शहरात वाढती नशेखाेरी गुन्हेगारीचे मूळ ठरत असल्याने पाेलिसांनी नशेचा बाजार मांडणाऱ्यांना रडारवर घेतले आहे. मागील कारवायांच्या चाैकशीत याचे धागेदाेरे भिवंडीपर्यंत पाेहाेचले हाेते. अपर पाेलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांनी संशयित अयाजच्या हालचालींवर लक्ष ठेवले हाेते. अयाज हा शहरातील अकरा हजार काॅलनीत खाेली घेऊन वास्तव्य करत हाेता. शनिवारी रात्री ताे कुत्ता गाेळ्या विक्रीच्या हेतूने ओवाडी नाला परिसरात फिरत हाेता. त्याच्याजवळील बॅगेत साठा असल्याची खात्री हाेताच पवारवाडीचे निरीक्षक सुधीर पाटील यांनी त्याला ताब्यात घेतले.
गुजरातमधूनही अशी नशेची औषधे आणली जात असल्याचे निष्पन्न झाले हाेते. पाेलिसांनी हे रॅकेट चालवणारा धुळ्याचा मुजम्मील हुसैन, शेरगिल जाविद यांना अटक केली होती. टाेळीतील अब्दुल मुस्सवीर इर्शाद अहमद उर्फ काेमडदादा व सूरतचा जुबेर युसूफ शेख उर्फ आर. के. यांनाही अटक केली होती. आता लखनाै शहरातून नशेची औषधे आणली जात आहे. या रॅकेटमध्ये नवीन व्यक्ती सक्रीय असल्याचा पाेलिसांना संशय आहे.