नाशिक – कोलकाता थेट हवाई सेवा सुरू करा
नाशिक (प्रतिनिधी ) –
नाशिकमध्ये पन्नास हजारहून अधिक बंगाली परिवार राहत असून त्यांना त्यांचे मूळ गाव कोलकत्ता तसेच पश्चिम बंगालमधील विविध शहरांना जाण्यासाठी नाशिक ते कोलकत्ता थेट हवाई सेवा सुरू करावी मुंबई कोलकता दुरांतो एक्सप्रेसला नाशिकमध्ये थांबा द्यावा अशा विनंतीचे निवेदन बंगाली अड्डा या बंगाली समाजाच्या नाशिकमधील संस्थेतर्फे खा . राजाभाऊ वाजे यांना देण्यात आले.
बंगाली अड्डाचे अध्यक्ष डॉ . संदीप रॉय म्हणाले की, नाशिकहून कोलकत्ता ला जाण्यासाठी थेट हवाईसेवा असावी अशी विनंती इंडिगो व एअर इंडिया या विमान कंपन्यांना याआधी करण्यात आली आहे . या विनंतीवर इंडिगो आणि एयर इंडिया सकारात्मक असून लवकरच ही हवाई सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. तसा मेलदेखील या विमान कंपन्यांकडून आला आहे.
मुंबईहून कोलकत्ताला जाण्यासाठी दुरांतो जलद रेल्वे आहे. सध्या दुरांतो एक्सप्रेसला नाशिक येथे थांबा नाही. हा थांबा असल्यास अनेकांची सोय होईल नाशिकहून कोलकत्ता , नागपूर , रायपूर येथे जाण्यासाठी अजून एक रेल्वे उपलब्ध होईल.
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या सेवा सुरू झाल्यास लाखो भाविक तर नाशिकमध्ये येतीलच सोबतच दोन्ही शहरांमधील व्यवसाय देखील वाढीस लागेल, असेही डॉ . संदीप रॉय यांनी नमूद केले.
नाशिक ते कोलकत्ता हवाई तसेच रेल्वे मार्गाने प्रभावीपणे जोडण्यासाठी नाशिकचे खा. राजाभाऊ वाजे यांना दिलेल्या निवेदनास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचेही डॉ. रॉय यांनी सांगितले. निवेदन देताना बंगाली अड्डातर्फे सौमित्र मुखर्जी, मृदूल देब व सुरजीत सेनगुप्तादेखील उपस्थित होते .