नाशिक : प्रतिनिधी
अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाला निमंत्रित न केल्याने शिवसेनेच्या ‘उबाठा’ गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात आरती करणार असल्याने ठाकरे यांच्या आरतीच्या भूमिकेला छेद देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यापूर्वीच श्री काळाराम मंदिरात आरती करणार आहेत.भाजपकडून शिवसेनेला चेकमेट देण्याचा हा प्रयत्न राज्यभर चर्चेत आला आहे.
२०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहे. त्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून भाजपकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. नाशिकमध्ये ‘महाविजय २०२४’ च्या परिपूर्तीसाठी मंगळवारी (ता. ९) नाशिकसह चार लोकसभा मतदारसंघांतील स्थितीचा आढावा घेतला गेला आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश कार्यालय प्रभारी तथा उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, स्थानिक खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत १२ ते १.३० पर्यंत नाशिक, दिंडोरी, शिर्डी, अहमदनगर लोकसभा मतदारसंघांतील कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांची बैठक स्वामिनारायण बोँट हॉल येथे झाली.
या बैठकीत चार लोकसभा मतदारसंघातील रणनीतीवर तसेच खासदारांनी केलेली कामे, संभाव्य उमेदवारांच्या नावावरही चर्चा करण्यात आली.
काळारामाची महाआरती
२२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. हा सोहळा नयनरम्य करण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहे. तीन हजार प्रमुख व्यक्तींना निमंत्रित करताना शिवसेनेचे नेते व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले नाही.त्यामुळे शिवसेनेच्या उबाठा गटाकडून शिवसेना कार्यकर्ता शिबिराच्या निमित्ताने श्री काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे.
या भूमिकेला चेकमेट म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यापूर्वी म्हणजे मंगळवारी (ता. ९) सकाळी अकराला श्री काळाराम मंदिरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत महाआरती करण्यात आली.