सोलापुरातील शिवसेनेच्या माजी आमदारांसह नेत्यांचा ओढा शिंदे गटाकडे

0
40

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार सांगोल्याचे ॲड. शहाजीबापू पाटील (Adv. Shahajibapu Patil) हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांच्या गटात गेल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेच्या माजी आमदारांसोबत इतर नेतेही शिंदे यांच्यासोबत जाण्याचे संकेत मिळत आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत काही मंडळींनी जाणीवपूर्वक आपल्याविषयी पक्षश्रेष्ठींना चुकीची माहिती दिल्यामुळे आपले तिकीट कापले गेले. त्यामुळे शिवसेनेशी आपला संबंध राहिला नाही. मात्र राज्य पातळीवर एकनाथ शिंदे गटाबरोबर आणि स्थानिक पातळीवर मोहिते-पाटील गटाच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेनेकडून माढा विधानसभा निवडणूक लढविलेले संजय कोकाटे यांनीही एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. करमाळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शिवसेनेच्या रश्मी दिगंबर बागल यांच्याशी माढ्याचे भाजपाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी खालबतं केली. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर रश्मी बागल शिवसेनेत सक्रीय दिसत नाहीत.

 

मागील विधानसभा निवडणुकांच्या आधी शिवसेनेने सध्या बंडखोरांच्या गटात असलेले माजी मंत्री तानाजी सावंत यांना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. त्यावेळी सावंत यांनी जिल्ह्यात पक्षांतर्गत पकड बसविण्यासाठी विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या मर्जीतील उमेदवार आणले होते. यात करमाळ्याचे तत्कालीन आमदार नारायण पाटील यांचे तिकीट कापून राष्ट्रवादीतून आयात रश्मी बागल यांना उमेदवारी दिली होती. तसेच, सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून मूळ दावेदार महेश कोठे यांचा पत्ता कापून शेवटच्या क्षणी दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप ब्रह्मदेव माने यांना सेनेत प्रवेश देत उमेदवारीही दिली होती. बार्शीत राष्ट्रवादीचे,माजी मंत्री दिलीप सोपल यांनाही शिवसेनेने शिवबंधन बांधून विधानसभेची उमेदवारी दिली होती. माढ्यात भाजपाचे संजय कोकाटे यांना शिवसेनेत प्रवेश देत विधानसभेचेही तिकीट तानाजी सावंत यांनीच मिळवून दिले होते. परंतु या सर्व उमेदवारांचा दारूण पराभव झाला. अशा प्रकारे सावंत यांचे गणित चुकल्यामुळे त्यांची शिवसेनेत उलटी गणती सुरू झाली.

करमाळा विधानसभा निवडणुकीत आपण विद्यमान आमदार असूनही केवळ तानाजी सावंत यांच्यामुळे आपली उमेदवारी कापण्यात आल्याचा आरोप करीत माजी आमदार नारायण पाटील यांनी बंडखोरी केली होती. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. परंतु सध्या राज्यातील बदलत्या राजकारणात तानाजी सावंत यांच्यावर असलेला राग नारायण पाटील हे विसरल्याचे दिसते. माढ्याचे संजय कोकाटे यांनीही शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर असलेली सलगी तोडावी आणि निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी करीत बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या सुरात सूर मिळवला आहे. तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचा कोकाटे यांनी निषेध केला आहे. कोकाटे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आणि मोहिते-पाटील गटाचे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here