मुंबई : प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीच्यानंतर राज ठाकरेंनी आपले मनोगत मांडले. मराठा आरक्षणाचा हा जो विषय आहे त्यातून तोडगा काढण्यासाठी नक्की प्रयत्न करु तसेच याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा करु असे आश्वासन राज ठाकरेंनी दिले आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या नावाने आश्वासन देणाऱ्या आणि ते पूर्ण न करणाऱ्या सगळ्यांवर टीका केली तसेच निवडणुकीच्या वेळी पुन्हा तुमच्याकडे हा विषय घेऊन येतील तेव्हा यांच्या भुलथापांना बळी पडू नका असेही आवाहन राज ठाकरेंनी केले.
सगळ्या आंदोलकांशी मी आत्ता बोलत होतो. ज्या ज्या वेळी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या तुमच्यापर्यंत चुकीच्या पद्धतीने पोहचल्या. मोर्चे निघत होते तेव्हाही म्हटले होते की, मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. मी आत्ता मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोललो. जातीचे,आरक्षणाचे आमीष दाखवून हे सत्तेत तर कधी विरोधातले सत्तेत. सत्तेत आले की तुम्हाला तुडवणार, गोळ्या झाडणार. विरोधात गेले की तुमच्यावर प्रेम उफाळणार यांचे. पोलिसांना दोष देऊ नका, आदेश कुणी दिला त्यांना दोष द्या, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. उद्या निवडणुकीच्या वेळी तुम्हाला आश्वासने द्यायला येतील, तेव्हा पाठीवरचे वळ विसरु नका असेही राज ठाकरेंनी म्हटले
आहे.