मुंबई : प्रतिनिधी
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे बंडखोरी केली आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी होऊन ते मुख्यमंत्रीही झाले. शिंदे यांच्या बडानंतर उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना निकाल देण्याचे आदेश दिले. त्यानंतर यासंदर्भात अध्यक्षांसमोर सुनावणी झाली. या सुनावणीतील पुरावे, कागदपत्रे, साक्षी अशी कार्यवाही पूर्ण होत अखेर शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाची तारीख निश्चित झाली आहे. १० जानेवारीला दुपारी ४ वाजेपर्यंत या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निकालाबाबत शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार?त्यांच्यासमोर कोणते पर्याय आहेत? याचीच चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याची चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १० जानेवारीपर्यंत निकाल देणे अनिवार्य होते.
विविध माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्षांच्या निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचेही काम सुरू आहे. निकालातील ऑरेटिव्ह पार्टच फक्त वाचला जाणार आहे.सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाण्याची शक्यता आहे.