‘ईमेल’मुळे वाढल्या शिंदे गटाच्या अडचणी

0
18

मुंबई : प्रतिनिधी

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. ठाकरे गटाने बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश ज्या ईमेल आयडीवर एकनाथ शिंदे यांना पाठवले होते, त्या मेल आयडीचा पुरावाच ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे सादर केला आहे. यामुळे शिंदे गटाच्यांच्या अडचणींत मोठी भर पडण्याची शक्यता आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ेोकर यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत शिंदे गटाच्या वकिलांनी उद्धव ठाकरे गटाने २२ जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या एका ईमेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांना पाठवलेला ईमेल चुकीचा आहे.तो शिंदेंचा नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश शिंदे यांना मिळालेच नाहीत, असा दावा त्यांनी केला होता.
शिंदे गटाच्या या दाव्यावर आता ठाकरे गटाने या ईमेलचा पुरावाच सादर केला आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या खऱ्या ईमेल आयडीवर मेल पाठवला. हा ईमेल आयडी विधानसभा सदस्यांच्या यादी पुस्तिकेत उपलब्ध आहे, असा दावा ठाकरे गटाने अध्यक्षांपुढे केला आहे.या संबंधी त्यांनी २० जून २०२२ रोजीच्या महाराष्ट्र विधानसभा सदस्यांची यादी असणारी पुस्तिकाही पटलावर सादर केली आहे. या पुस्तिकेत राज्यातील सर्व आमदारांची नावे, पत्ता, फोन क्रमांक व ईमेल आयडी उपलब्ध आहेत. त्यावर शिंदे यांच्या नावापुढे ठाकरे गटाने पाठवलेल्या ईमेल आयडी नमूद आहे.

नार्वेकरांपुढे सुरू आहे सुनावणी
दुसरीकडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे सुरू असलेल्या सुनावणीत गत ५-६ दिवसांपासून ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी सुरू आहे. त्यांच्या उलटतपासणीचा आजचा शेवटचा दिवस आहे. शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी, तर ठाकरे गटाकडून देवदत्त कामत युक्तिवाद करत आहेत.

काय आहे एकनाथ
शिंदेंचा ईमेल आयडी?
या पुस्तिकेत एकनाथ शिंदे यांचा अधिकृत ईमेल आयडी eknath.shinde@gmail.com असल्याचे नमूद आहे. ठाकरे गटाने याच ईमेलवर बैठकीला हजर राहण्याचे आदेशवजा पत्र एकनाथ शिंदे यांना पाठवले होते. दुसरीकडे, शिंदे गटाच्या वकिलांनी सुनावणीत हा ईमेल आयडी एकनाथ शिंदे यांचा नसल्याचा दावा केला होता. त्यांनी २०२३ च्या पुस्तिकेतील आमदारांच्या माहितीचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांचा ईमेल आयडी ministereknathshinde@ gmail.com हा असल्याचा दावा केला आहे. पण आता ठाकरे गटाने पुराव्यासह त्याचा दावा खोडल्यामुळे शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांची अडचण वाढली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here