कोल्हापूर/जुन्नर : वृत्तसंस्था
छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नखं ही लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असल्याचा सरकारचा दावा आहे तसेच ती वाघ नखं पुढील तीन वर्षांसाठी राज्य सरकार महाराष्ट्रात आणणार आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी (१ ऑक्टोबर) ब्रिटनला रवाना झाले आहेत. यावरून आता आरोप-प्रत्यारोपाच्या सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर येथील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी वाघ नखासंदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत तसेच सरकारने शिवप्रेमींची दिशाभूल करू नये,असे मत व्यक्त केले. या वादावर आता राष्ट्रवादी कांँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (१ ऑक्टोबर) पुण्यातील जुन्नर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, “मला काही त्यातले ज्ञान नाही मात्र, इंद्रजीत सावंंत हे मराठी भाषेतील इतिहासाचे जाणकार आहेत. त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनख्यांबाबत वेगळं मत आहे हे मी टीव्हीवर पाहिले. असं असलं तरी मला प्रत्यक्षात त्याबाबत माहिती नाही तसेच त्याबाबत वाद निर्माण करावा असे मला वाटत नाही.
इंद्रजित सावंंत म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधाच्या वेळेला जी वाघ नखं तसेच शस्त्र वापरली याविषयीची स्पष्टता इ.स. १९१९ पर्यंत होती. कारण, ही शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होते. त्याविषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत पण, आत्ता जे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात असलेली वाघ नखं महाराष्ट्र सरकार भारतात परत आणत आहेत, ती अफजलखानाचा वध केलेली वाघ नखं नाहीत हे स्पष्ट आहे.
“साताऱ्यात इ.स. १९१९ पर्यंत वाघ नखे असल्याच्या नोंदी आणि छायाचित्र आहेत. मग, इ.स १९१९ च्या आधी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात असलेली वाघ नखे ही शिवाजी महाराज यांची असूच शकत नाही,” असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले.
वाघ नखे ग्रँट डफ नावाच्या इतिहासकाराला भेट
इंद्रजित सावंत पुढे म्हणाले, “इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावच्या पराभवानंतर सातारा छत्रपतींच्या गादीवर प्रतापसिंह महाराज यांना बसवले होते. त्या महाराजांनी ग्रँट डफ नावाच्या इतिहासकाराला ज्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला, जो साताऱ्याचा रेसिडेंट सुद्धा होता आणि प्रतापसिंह महाराजांशी त्याची चांगली दोस्ती होती.त्यांना भेट म्हणून वाघनखं दिली होती.ती वाघनखं व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ग्रँट डफ यांचा वंशज अंड्रियन ग्रँट डफ यांना तिथे दिसली असून तशी स्पष्ट नोंद म्युझियमच्या कॅटलॉगमध्ये उपलब्ध आहेत.त्या वाघ नखाच्या लेबलवर देखील उल्लेख असून संग्रहालयाच्या कॅटलॉगमध्ये देखील ती वाघ नखे ही छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल वाघ नखे असल्याची अशी कोणतीही नोंद नाही.
सरकारने शिवप्रेमींची दिशाभूल करू नये
“शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघ नखे आणण्याची कथा रचली जात आहे.हे साफ खोटं आहे. इतिहासाच्या कसोटीवर हे टिकणार नाही. सरकारने शिवप्रेमींची दिशाभूल करू नये. ही वाघ नखे शिवाजी महाराज यांच्या वापरातील असतील तर त्याचे पुरावे सरकारने सादर करावेत, असे आव्हान इंद्रजित सावंत यांनी दिले आहे.