मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी कांँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटातील नेत्यांकडून शरद पवारांवर करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की १९९३ साली पक्ष स्थापन झाला, याची स्थापना कोणी केली, महाराष्ट्रातील लहान पोरं देखील याचे उत्तर सांगतील शरद पवार यांनी केला. घड्याळ देशभरात कुणी नेलं, ओडिसा, अरुणाचल प्रदेश, आसाममध्ये आमदार होते ते कुणामुळं होते, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
शरदचंद्र सिन्हा यांच्यासारखा काँग्रेसमधील वरिष्ठ नेता शरद पवारांसोबत उभा राहिला होता. केरळमध्ये पक्षाचे लोकप्रतिनिधी होते, या पक्षाला राष्ट्रीय नेतृत्त्व कुणामुळं मिळालं होतं, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला केला.
तुम्हाला ५ जुलैच्या सभेत शरद पवारांचा फोटो कशासाठी वापरावा वाटला. कालपर्यंत तुम्ही शरद पवार आमचे दैवत आहेत, असे म्हणायचे आणि आज शरद पवारांवर एवढ्या गोळ्या घालण्याचे कारण काय? आणि कुणी गोळ्या झाडाव्यात, असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना विचारला आहे.
शरद पवारांना संपवण्याची सुपारी त्यांनी घेतली आहे. कारण ते काय जादूगार आहेत हे त्यांना ते माहिती आहे. त्यामुळे १९९३ साली शरद पवार काय म्हणाले होते, १९९६ साली शरद पवार काय म्हणाले होते, हे कशासाठी काढत आहात, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
तुम्ही पुरावे द्या, नाहीतर मी देतो
अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देत जितेंद्र आव्हाड यांनी माझी आणि जयंत पाटलांची बैठक झाली नव्हती, कुठं झाली होती, काय पुरावे आहेत? असा प्रतिप्रश्न केला. मी तुमचा पुरावा देतो, तुम्ही कुठल्या फ्लाइटने कधी दिल्लीला गेलात,त्या फ्लाइटचा व्हीटी नंबर सगळं देतो. रात्रीच्या अंधारातच तुम्हाला कशाला दिल्लीला जायचं होतं, असा प्रश्न देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला.