नागपूर : वृत्तसंस्था
आज राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मोठी आंदोलनं सुरु आहेत. परंतु, मराठा आरक्षणाचा इतिहास काढून बघितला तर कळेल की, मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध हा शरद पवार यांनीच केला. त्यांना वारंवार संधी मिळाली. त्यांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला असता तेव्हाच शरद पवार यांनी मराठा आरक्षण दिले असते. पण शरद पवार यांना मराठा समाजाला कधीच आरक्षण दिले नाही, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते शनिवारी नागपूर येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
शरद पवार यांना केवळ विविध समाजांना झुंजवत ठेवण्यात जास्त रस आहे. लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपद राहील, ही शरद पवारांच्या राजकारणाची पद्धत राहिली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी लोकांना सतत झुंजवत ठेवण्याचे काम केले, असे फडणवीस यांनी म्हटले.
महाविकास आघाडीची सत्ता असताना सुप्रिया सुळे म्हणायच्या की, राज्यात मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? भाजपचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले.आपले सरकार असताना ते सर्वोच्च न्यायालयात टिकलेही, पण सरकार गेल्यानंतर मराठा आरक्षणावर स्थगिती आली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करेल. पण कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊन देणार नाही. ओबीसी आरक्षणावर कुठलेही संकट येऊ देणार नाही, हे भाजपचे वचन आहे. भाजपमधील ओबीसी आणि मराठा कार्यकर्त्यांना आपल्या समाजाची बाजू योग्य वाटणे साहजिक आहे पण दोन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपला पक्ष आपल्या समाजाला न्याय देईल, यावर विश्वास ठेवावा. कोणत्याही परिस्थितीत समाजात विभाजनाचे लोण पसरुन देऊ नका, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मराठा आणि ओबीसी हे समाज आपल्यासाठी केवळ व्होटबँक नाहीत.आपण निवडणुकीच्या निकालाचा विचार करुन कोणत्याही समाजाबाबत निर्णय घेत नाही. मुळात या मुद्याचा निवडणुकीवर फरक पडत नाही. हे समाजाचे प्रश्न आहेत. त्याकडे निवडणुकीच्या चष्म्यातून पाहू नका.त्यामुळे निवडणुकीत काय होणार, याची चिंता भाजपच्या कार्यकर्त्यांनी करु नये. चिंता करायची असेल तर महाराष्ट्राचे सोशल फॅब्रिक कुठेतरी उसवले जात आहे, फाटत आहे,त्याबद्दल विचार केला पाहिजे. ही परिस्थिती चिंताजनक आहे. गावगाड्यावर सर्व लोक एकत्र राहिले आहेत. सगळे लोक एकमेकांवर अवलंबून असतात. प्रत्येक समाजाचे महत्त्व वेगळे असते. पंतप्रधान मोदी म्हणतात की, जात, धर्म महत्त्वाचा नाही. माझ्यासाठी गरिबी ही एकच जात आहे. आरक्षणाची भावना गरिबीतून निर्माण होते. त्या भावनेपोटी आपण मागास आहोत, असे संबंधितांना वाटते. त्यामुळे आपण आरक्षण देऊच परंतु, मागासलेपणच दूर नाही झाले तर कितीही आरक्षण देऊन फायदा होणार नाही, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.
