शरद पवार अन्‌‍‍ उदयनराजे एका व्यासपीठावर

0
10

जालना : वृत्तसंस्था

जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात शनिवारी राष्ट्रवादी काँंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व भाजपचे खासदार उदयनराजे एका व्यासपीठावर आले. उदयनराजे सुरुवातीला मनोज जरांगे व त्यांच्या सहकारी आंदोलकांची भेट घेण्यासाठी सराटीला दाखल झाले.त्यांचा आंदोलकांशी संवाद सुरू असतानाच तिथे शरद पवार यांचा ताफा धडकला.
अंतरवाली सराटीत शुक्रवारी पोलिसांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार केला होता.त्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार व खासदार उदयनराजे यांनी शनिवारी अंतरवाली सराटीला भेट दिली.
शरद पवारांनी रुग्णालयात जावून जखमींची भेट घेतली. त्यानंतर ते प्रत्यक्ष उपोषणस्थळी जावून आंदोलकांना भेटले. ते तिथे पोहोचण्यापूर्वीच उदयनराजे मनोज जरांगे व त्यांच्या सहकारी आंदोलकांशी संवाद साधत होते. यावेळी जरांगे यांनी उदयनराजे यांना घटनेची माहिती दिली.
त्यावर उदयनराजे यांनी त्यांना उपोषण सोडून घरी परतण्याचे आवाहन केले.उदयनराजे व मनोज जरांगे यांच्यात हा संवाद सुरू असताना अचानक तिथे शरद पवार यांचा ताफा येऊन धडकला. यामुळे काहीशी धावपळ उडाली. शरद पवार व्यासपीठाच्या खाली लावलेल्या एका खुर्चीत बसले. यावेळी उपस्थितांनी चांगलीच घोषणाबाजी केली.
काय म्हणाले शरद पवार?
मुख्यमंत्र्यांनी नुकताच आंदोलकांशी संवाद साधला होता. त्यात ठराविक दिवसांत हा प्रश्न तडीस नेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण दुर्दैवाने जे ठरले ते झाले नाही. त्यामुळे मनोजने उपोषण करण्याचा निर्णय घेतला. आज उपोषणाचा ५ वा दिवस आहे. मी काल सर्व माहिती घेतली आणि आज आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी येथे आलो, असे शरद पवार यावेळी म्हणाले.
सरकारने एका बाजूला चर्चा सुरू केली आणि दुसऱ्या बाजूने मोठ्या संंख्येने पोलिस आणले. त्यांनी लोकांवर बळाचा वापर केला.हवेत गोळीबारही केला. बंदुकीच्या छर्ऱ्यांनी अनेकजण जखमी झाले. आंदोलकांनी कौतुकास्पद संयम दाखवला. त्यांनी कायदा हातात घेतला नाही. शांततेत सुरू असणाऱ्या या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, असे शरद पवार
म्हणाले.
काय म्हणाले उदयनराजे?
उदयनराजे यावेळी म्हणाले की, आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. हे फार वर्षांपूर्वीच होणे अपेक्षित होते. अन्याय झाल्यानंतर असा उद्रेक होणे स्वाभाविकच आहे. माझी नुकतीच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी भेट झाली. २-३ दिवसांत चर्चा करून पुन्हा त्यांची आंदोलकांशी भेट घालून देईल.आतापर्यंत एक-दोन नव्हे तर तब्बल ५७ मोर्चे निघाले. पण कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. इतर समाजासारखाच मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे, असे उदयनराजे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here