शरद पवार आणि उबाठा गट महाविकास आघाडीतून वेगळा होणार

0
11

अमरावती ः वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीमुळे महाविकास आघाडीतले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) मित्रपक्ष अस्वस्थ आहेत. महाविकास आघाडीत एकीकडे संभ्रम असल्याचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे नेते सांगत आहेत. तसेच दुसऱ्या बाजूला आम्ही आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढू असंही म्हणत आहेत. त्याचबरोबर काँग्रसचे नेते आपल्याकडे प्लॅन बी असल्याचं सांगत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. संजय शिरसाट म्हणाले, महाविकास आघाडीमधील सगळेजण सध्या द्विधा मनःस्थितीत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीतल्या नेत्यांचा रक्तदाब वाढला. मग लगेच संजय राऊत यांनी शरद पवारांना भीष्म पितामहांची उपाधी दिली. त्याचबरोबर शरद पवारांचं हे वागणं बरोबर नाही इतकं बोलण्यापर्यंत राऊतांची मजल गेली. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचं वक्तव्य बदललं. राऊत म्हणाले, आम्ही आगामी निवडणूक महाविकास आघाडीत लढणार आहोत. दुसऱ्या बाजूला काँग्रेसवाले म्हणत आहेत की त्यांच्याकडे ए, बी, सी असे वेगवेगळे फॉर्म्युले तयार आहेत. यावरून महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नाही असंच दिसतंय.
संजय शिरसाट म्हणाले, महाविकास आघाडीत संभ्रमावस्था असल्यामुळेच उबाठा गटाने लोकसभेच्या ४८ जागांसाठी बैठका सुरू केल्या आहेत. हे कशाचं द्योतक आहे? कारण त्यांना समजलंय की आता ‘एकला चलो रे’ची तयारी करावी लागणार आहे. मग आता काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. म्हणून त्यांनी बैठकींचं सत्र सुरू केलं आहे. एकीकडे आमची आघाडी आहे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आमच्याकडे ए. बी, सी असे सगळे फॉर्म्युले आहेत असंही म्हणायचं. आणि हे लोक काय शरद पवारांना दूर करणार? पवारांनी आता यांचं अस्तित्व संपवलं आहे आणि हे (ठाकरे गट काँग्रेस) आता काही कामाचे राहिले नाहीत म्हणून पवारांनी यांना टाकून दिलंय. त्यामुळे आता महाविकास आघाडीतून शरद पवार वेगळे होतील आणि उबाठा गट वेगळा होईल.
महाविकास आघाडीवाले संभ्रमावास्थेत
आमदार संजय शिरसाट म्हणाले, मी याआधीही सांगितलं आहे की यांची महाविकास आघाडी टिकणार नाही. उबाठा गट (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) आणि काँग्रेस यांची कुठेही वैचारिक बैठक होऊ शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रसने कधीतरी महाविकास आघाडीत घुसण्याचा प्रयत्न केला, त्यांना थोडा सॉफ्ट कॉर्नर मिळत होता, परंतु, ते आता बाजूला जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीवाले सध्या संभ्रमावस्थेत आहेत, ते व्हेंटिलेटरवर आहेत. यांना कळत नाही नेमकं कुठे जायचं आणि काय करायचं?

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here