नवीदिल्ली ः वृत्तसंस्था
आपला प्रियकर सचिनसाठी सीमा ओलांडून भारतात दाखल झालेल्या सीमा हैदरला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोकसभेचे तिकीट देणार असल्याची चर्चा रंगली आहे पण खरंच आरपीआय सीमा हैदरला निडणुकीसाठी तिकीट देणार आहे का? यासंबंधी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पक्षाचा नेमका काय विचार आहे हे सांगितले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मासूम किशोर यांनी सांगितले होते की, “सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली आहे. भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी सीमाला क्लिन चीट दिल्यास आणि तिला भारतीय नागरिकत्व मिळाल्यास तिचे पक्षात स्वागत आहे. भारताचा नागरिक असलेल्या प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले.
सीमाच्या आतापर्यंतच्या तपासात तिच्यावर कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. सुरक्षा यंत्रणांची क्लीन चिट मिळाल्यास सीमाला प्रवक्तेपद देण्यात येईल, कारण ती एक चांगली वक्ता आहे, असेही मासूम किशोर यांनी म्हटले होते पण रामदास आठवलेंनी तिकीट देणार नसल्याचे स्पष्ट केले असून मासूम किशोर यांनी आपल्याला न विचारता विधान केल्याची माहिती दिली आहे.
रामदास आठवलेंनी स्पष्ट केली भूमिका
रामदास आठवले यांनी सीमा हैदरला पक्षाचे तिकीट देण्याचा प्रश्नच नाही असे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सीमा हैदरला तिकीट देऊ, पण ते पाकिस्तानला जाण्याचे असेही ते म्हणाले आहेत. ते म्हणालेत “सीमा हैदरशी आमच्या पक्षाचा काही संबंध नाही. सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली आहे. ऑनलाइन गेमच्या माध्यमातून सचिनशी ओळख झाल्यानंतर ती आपल्या मुलांना घेऊन पोहोचली आहे. सुरक्षा यंत्रणा याबाबत तपास करत आहेत. मासूम किशोर यांनी मला कोणतीही माहिती न देता विधान केले आहे.सीमा हैदरला पक्षात घेण्याचा प्रश्नच नाही. जर तिला तिकीट द्यायचे असेल तर पाकिस्तानला जाण्याचे देऊ पण तिला पक्षाचे तिकीट देणार नाही.