मुंबई : प्रतिनिधी
केंद्र सरकारने हिट ॲण्ड रनसंदर्भात पारित केलेल्या नव्या कायद्याविरोधात वाहतूक संघटनांच्यावतीने संप पुकारण्यात आला आहे. मंगळवारी या संपाचा दुसरा दिवस असून याचा परिणाम शाळांच्या बसेसवरही होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालकांच्या संघटनांनी घेतला आहे.
यासंदर्भातील बातम्या समोर आल्यानंतर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्कूल बसच्या संघटनांनी या संपात सहभागी होऊ नये असे आवाहन केले आहे तसेच संपात सहभागी झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा थेट इशाराच शिक्षणमंत्र्यांना दिला आहे.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
स्कूल बसच्या चालकांनी संपामध्ये सहभागी होऊ नये. नाहीतर कारवाईचा वेगळा विचार केला जाईल. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी सर्वांना घ्यायला हवी असे दिपक केसरकर यांनी म्हटले आहे. कायदा सुव्यवस्था बिघडेल असें कोणीही वागू नये. बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असेही केसरकर म्हणाले.
विद्यार्थ्यांना फटका
बसण्याची शक्यता
हिट ॲण्ड रनसंदर्भातील कायद्याविरोधात वाहतूक संघटनेने सुरु केलेल्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. संपामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने बसमधील डिझेलची बचत करण्याच्या उद्देशाने बस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनांनी घेतला आहे.