जालना : वृत्तसंस्था
मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची अभिनेते सयाजी शिंदे यांनी बुधवारी अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सयाजी शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले.
मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे आणि त्यासाठी कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या माणसाने ‘न भूतो न भविष्यती’ अशाप्रकारचे कार्य आरंभलं आहे, त्याला शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे, असे सयाजी शिंदे यांनी म्हटले. माझ्यात आणि जरांगे पाटील यांच्यात काही चर्चा झाली नाही. मी काही अभ्यासक नाही, आमच्यात चर्चा वगैरे झाली नाही. मी फक्त आलो, भेटलो, चहापाणी घेतलं, असे सयाजी शिंदे यांनी म्हटले. सध्याच्या घडीला सगळ्यांचीच परीक्षा सुरु आहे. जरांगे पाटील परीक्षेत उत्तम आहेत, आता राजकारण्यांचीही परीक्षा सुरु आहे. मुळात मराठा समाजातील तरुण आणि विद्यार्थ्यांचा विचार केला पाहिजे, असेही सयाजी शिंदे यांनी सांगितले.
येत्या २० तारखेला मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आंदोलक अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. त्यानंतर सहा दिवस पायी प्रवास करत मराठा जनसमुदाय मुंबईत पोहोचेल. मुंबईत आल्यानंतर मनोज जरांगे आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु करतील. हे आंदोलन दीर्घकाळ सुरु राहण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यासोबत येणाऱ्या मराठा बांधवांना ट्रॅक्टर, गाड्या व आवश्यक ती साधनसामुग्री सोबत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईतील या मोर्चासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि अन्य मराठा संघटनांकडून जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणासाठी मुंबईत येण्याची गरजच पडणार नाही, त्यापूर्वीच या मुद्द्यावर तोडगा निघेल, असा आशावाद राज्य सरकारने व्यक्त केला आहे.