म्हणे… ‘कोणी मंत्रीपद घेता का मंत्रीपद’

0
42

नटसम्राट हे नाटक एकेकाळी रंगमंचावर खूप गाजले.त्यानंतर त्यावर आधारित मराठी चित्रपटही येऊन गेला.त्यामागे अनेक कारणं होती.या नाटकात काळानुरुप दत्ता भट,यशवंत दत्त, डॉ.श्रीराम लागू, चंद्रकांत गोखले यांनी अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका वठवली होती तर मराठी चित्रपटात नाना पाटेकर यांनी ती भूमिका समर्थपणे निभावली. यातील संवादही गाजले होते.त्यात आप्पासाहेबांच्या तोंडी एक संवाद होता तो म्हणजे ‘कोणी घर देता का घर’ यासंवादाची आठवण सध्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्यानिमित्ताने केली जात आहे.आपल्या दौऱ्यात ते भाजपाचे संघटन मजबूतीवर भर देतील असे वाटत असतानाच त्यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडतांना,जिल्हानिहाय मंत्रीपदे वाटपाचा सपाटा लावल्याचे दिसत आहे.त्यामुळे ‘कोणी मंत्रीपद घेता का मंत्रीपद’ असे चित्र निर्माण झाले आहे.या घोषणेमुळे ज्यांना मंत्रीपद मिळत आहे ते तर खुष होत आहेतच मात्र ज्यांना भविष्यात मंत्रीपद मिळण्याची आशा होती,त्याचे नाव या घोषणेत नसल्यामुळे त्यांच्या पदरी नाराजी पडणे स्वाभाविक आहे आणि नव्याने जे निवडून येतील,त्या आमदारांनी तर अपेक्षा न केलेलीच बरी.
भाजपाने राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे.त्यासाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय सर्व्हे करण्यात येत असून आमदार व खासदारांच्या कामाचा लेखाजोखा घेतला जात आहे.येत्या निवडणुकीत कोणाचे तिकीट कायम ठेवायचे आणि कोणाचा पत्ता कट करायचा,याचा आढावाही घेतला जात आहे.त्यादृष्टीने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते नुकतेच येऊन गेले.त्यांनी या दौऱ्यात पक्ष मजबुतीवर भर न देता, आगामी निवडणुकीनंतर जिल्ह्यात कोण कोण मंत्री होतील,याबाबत भविष्यवाणी करुन टाकली.जळगाव ग्रामीण,जळगाव शहर,अमळनेर व जामनेरला मंत्रीपद मिळेल,अशी घोषणा करुन टाकली.याचा अर्थ गिरीष महाजन-जामनेर,राजूमामा भोळे- जळगाव महानगर,गुलाबराव पाटील-जळगाव ग्रामीण आणि अनिल भाईदास पाटील-अमळनेर हे मंत्री होणार.असे झाले तर विस्तारीत मंत्रीमंडळात आपला नंबर लागेल अशी अपेक्षा असलेले किशोरअप्पा पाटील व चिमणराव पाटील हे कुठे जातील.याशिवाय भुसावळचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय सावकारे यांचा नंबर लागणारच नाही का, असा प्रश्नही उपस्थित होतो.विशेष म्हणजे बावनकुळे यांची ही भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरण्यासाठी गिरीष महाजन,राजूमामा भोळे,गुलाबराव पाटील व अनिल भाईदास पाटील हे पुन्हा निवडून आले पाहिजे.मतदार कधी कोणाला निवडून देतील आणि कधी कोणाचा पत्ता कट करतील,हे सांगणे कठीणच.मतदारांनी कोणाला कौल दिला आहे,हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होत असते.
भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.बावनकुळे यांनी जिल्हानिहाय दौऱ्यात तीन-चार आमदारांना अशी मंत्रीपदे वाटप केली तर ती संख्या महाराष्ट्रात शंभराच्या वर जाईल आणि राज्यात मंत्र्यांची संख्या केवळ त्रेचाळीस आहे.मग हे गणित कसे जमणार,हा प्रश्न उभा ठाकत असून मग हे ‘चॉकलेट’ वाटप तर नाही ना,अशी शंका व्यक्त झाल्यास नवल वाटू नये.यात जनतेला आणखी एक प्रश्न पडत आहे की,बावनकुळे हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून एक वरीष्ठ नेते निश्चित आहे पण मंत्रीपदे वाटप करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार पक्षश्रेष्ठींनी दिला आहे का? बावनकुळे जी यादी करतील त्यावर पक्षश्रेष्ठी शिक्कामोर्तब करतील का? पक्षातील कोणत्या आमदाराला मंत्री करायचे,याचा निर्णय त्या-त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते घेतात ही सर्वसाधारण प्रथा आहे.त्याची अंमलबजावणी होत असते.अशा परिस्थितीत बावनकुळे यांना भाजपासह शिवसेना(शिंदे गट)आणि राष्ट्रवादी(अजित पवार गट) म्हणजेच महायुतीचे मंत्रीपदे वाटपचा अधिकार तर देण्यात आला नाही ना,असा प्रश्न पडणेही स्वाभाविक आहे कारण त्यांनी जळगाव जिल्ह्यात गिरीष महाजन व राजूमामा भोळे या भाजपा आमदारांबरोबर गुलाबराव पाटील(शिवसेना शिंदे गट) आणि अनिल भाईदास पाटील(राष्ट्रवादी अजित पवार गट)यांच्या मंत्रीपदाची घोषणा करुन टाकली.बावनकुळेंना हे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
२०१९ मध्ये झालेली निवडणूक आणि २०२४ मध्ये होणारी निवडणूक यात जमीन-अस्मानचा फरक राहणार आहे कारण गेल्या पाच वर्षात राज्यासह जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बरीच बदलली आहेत.त्याच प्रमाणे मैदानातील उमेदवारही बदलणार आहे.त्यामुळे लढतीतही रंग भरणार आहे.महायुती विरुध्द महाआघाडी असा सरळ सामना होणार असला तरी नविन चेहरे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने निकालाचे पारडेही फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.जे काही निकाल लागतील त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल व त्यानंतर नवे सरकार व मंत्रीमंडळ स्थापन होईल.त्यावेळी त्या-त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ घालतील याचे कोडं सुटेल.पण त्याअगोदरच राज्यात फिरतांना जिल्हानिहाय मंत्रीपदाचे वाटप करण्याची घोषणा हास्यास्पद ठरण्याची शक्यता आहे.त्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र दौऱ्यात मंत्रीपदांचे वाटप जाहीर करण्याऐवजी भाजपाला मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यावर भर दिला तर पक्षबांधणीच्यादृष्टीने त्याचा निश्चितच लाभ झाल्याशिवाय राहणार नाही.
‘कोणी मंत्रीपद घेता का मंत्रीपद’ अशी वल्गना करण्यापेक्षा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी उतावीळ न होता,पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुचनेनुसार,केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना घरोघरी पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्यासाठी प्रोत्साहीत केल्यास त्याचा लाभ आगामी निवडणुकीत निश्चित मिळेल.मंत्रीपदे वाटपात मग्न राहिला तर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वेगळे निकाल लागल्यास नवल वाटू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here