जालना : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणासाठी गावागावात साखळी उपोषणाचे रुपांतर आज आमरण उपोषणात झाले आहे. मनोज जरांगे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून पोटात अन्नपाणी नसल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचे बोलणे मंदावले आहे. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपचार न घेण्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. दरम्यान ‘जरांगे सरकार’ साठी मंत्रिमंडळाच्या आरक्षण समितीची आज (सोमवारी) मुंबईत बैठक होत आहे.त्यातून काही तोडगा निघतोय काय,याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तथापि आज दिवसभर राज्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक तितक्याच तीव्रतेने समोर आला.
साखळी उपोषण आणि आमरण उपोषणासाठी मराठा बांधवांनी आपापल्या हद्दीतील पोलीस स्टेशनला परवानगीचे अर्ज द्या म्हणजे सरकारला माहीत होईल की गावागावात आमरण उपोषण आणि साखळी उपोषण सुरू झाली आहेत,असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांंना केले आहे.
आरक्षण हेच माझे उपचार असे म्हणत आपण आरक्षण घेऊच,पण कोणीही आत्महत्या किंवा उग्र आंदोलन करू नये असे आवाहनदेखील मनोज जरंगे यांनी मराठा समाज बांधवांना केले आहे.शांततेच्या मार्गानेच मराठ्यांना आरक्षण मिळणार असून सर्वांनी आपली एकजूट कमी होऊ देऊ नका असंही मनोज जरांगे मराठा बांधवांना उद्देशून
म्हणाले.
गड्यांनो मला माफ करा
“गादीने मराठा समाजाच्या कल्याणासाठी कधीही माघार घेतलेली नाही. मीही समाजाच्या कल्याणासाठी माघार घेणार नाही. मी गादीचा शब्द कधीही खाली पडून दिला नाही मात्र, माझा नाईलाज आहे. समाजाच्या कल्याणासाठी, समाजाला न्याय मिळावी म्हणून मला ही कठोर भूमिका घ्यावी लागत आहे. मराठ्यांची लेकरंबाळं फार तरसली आहेत.त्यामुळे गड्यांनो मला माफ करा,” अशी भावना मनोज जरांगे यांनी व्यक्त केली.
मी पाणी उपचार घेऊ शकत नाही कारण माझ्या लेकरांच्या काय वेदना आहेत या सरकारने ओळखल्या पाहिजेत. सरकारने यावर तातडीने निर्णय घेऊन मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावावा.
मराठा आरक्षणासाठी
आणखी तिघांची आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी लातूर, बीड आणि पुणे जिल्ह्यात प्रत्येकी एकाने आत्महत्या केल्याचे शनिवारी समोर आले. लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील ढाळेगावच्या महेश बाबूराव कदम-पाटील या २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील शत्रुघ्न अनुरथ काशिद (वय ४२) यांनी पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन जीवन संपवले. लातूरच्या माजी सरपंचाने आळंदीत इंद्रायणी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. व्यंकट ढोपरे (वय ६०) असे त्यांचे नाव आहे.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हे बोलत का नाहीत?
‘दोन दिवसांत आरक्षण मिळण्याची शक्यता आहे’असे विधान आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी केले आहे. याबद्दल विचारल्यावर जरांगे-पाटील म्हणाले, “दोन दिवसांत आरक्षण मिळेल, असे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री का सांगत नाहीत?”
‘माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर चर्चा होऊ शकत नाही’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले होते. यावर जरांगे-पाटलांनी सांगितले, “चर्चेला यावं, मराठे कुठेही आडवणार नाहीत. मला बोलता येतेय,तोपर्यंत चर्चेला या. नंतर येऊन उपयोग नाही. फक्त एकदाच चर्चेला येणार की नाही, हे सांगा. बाकीची वळवळ करायची नाही,” असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.