औरंगजेबाच्या कबरीचा संरक्षित
स्मारक दर्जा काढा ; हायकोर्टात याचिका
नाशिक ( प्रतिनिधी)-
छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीला दिलेल्या राष्ट्रीय संरक्षित स्मारक दर्जावरून वाद निर्माण झाला आहे. हा दर्जा काढण्यासाठी नाशिक येथील रतन लथ यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
याचिकेत लथ यांनी दावा केला आहे की, “कबर १९५२ मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली होती. मात्र, काही संघटनांचा यावर आक्षेप असून, या कबरीला दर्ग्याचा दर्जा देणे चुकीचे आहे. यामुळे देशप्रेमी मुस्लिम समाज अडचणीत आला आहे”.
ज्याने चुकीच्या पद्धतीने राज्य केले, त्याच्यासाठी आपण भांडणे का करायची? तो बादशहा नव्हता, मुळात तो आपला नव्हताच. भारतात त्याचा जन्म झाला असेल, तरी देशासाठी त्याने काहीही केले नाही. त्याचा इतिहास बघितला तर एकही चांगली गोष्ट त्याने केलेली नाही”, असे त्यांनी म्हटले आहे.
विशेष दर्जा असल्यामुळे सध्या ही कबर काढणे शक्य नाही. मात्र, हा दर्जा हटवल्यास पालिका बुलडोझर लावून ती काढू शकते. उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा असा दर्जा द्याल का? असे म्हणत लथ यांनी औरंगजेबाची जी काही माती असेल ती त्याच्या देशात पाठवा”, असेही म्हटले आहे.
या याचिकेवर मुंबई हायकोर्ट काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष दर्जा हटवण्याची मागणी मान्य झाल्यास पुढील कारवाई कशी होते, यावर चर्चा रंगली आहे.
मी हिंदू नाही, पण पारशी आहे आणि देशप्रेमी आहे. औरंगजेब हा क्रूर होता. त्याने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा छळ केला. अशा व्यक्तीच्या कबरीला दर्ग्याचा दर्जा देणे चुकीचे असून गरज नसताना वाद उकरला जात आहे, असे रतन लथ यांनी म्हटले आहे.