साईमत मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रात विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे.एकीकडे भाजपा, शिंदे गट व अजित पवार गट या तीन मित्रगटांच्या आघाडीकडून नेतेमंडळी ४५ हून अधिक जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. दुसरीकडे ठाकरे गट, काँग्रेस व शरद पवार गट यांनीही सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील इतर पक्ष, विशेषत: राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यासंदर्भात आता खुद्द राज ठाकरेंनी सूचक वक्तव्य करीत लोकसभा निवडणुकीत आघाडीचे संकेत दिले.
मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांची आज राज ठाकरेंनी बैठक आयोजित केली होती.या बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसंदर्भात प्राथमिक नियोजन करण्यात आल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
“आत्ताची ही बैठक पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा व महानगर पालिका निवडणुकांसाठी होती. यावर्षी महानगर पालिका निवडणका लागतील असे वातावरण मला दिसत नाही. महाराष्ट्रात झालेल्या राजकीय घोळात आता कुणी महानगर पालिकेच्या निवडणुका लावतील आणि पायांवर धोंडा पाडून घेतील असे मला वाटत नाही पण आता ज्या निवडणुका लागतील, त्या लोकसभेच्याच लागतील असे वाटते.त्यानुसार प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी होईल,अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी दिली.
एकला चलो रे की आघाडी?
यावेळी काही पत्रकारांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेची नेमकी काय भूमिका असेल? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरेंनी सूचक विधान केले. “परिस्थितीनुसार गोष्टी ठरतात. आता तर तुम्हाला सगळ्यांना सवयही झालीये त्याची पण महाराष्ट्राची प्रतारणा आपल्याकडून होणार नाही, याची जास्तीत जास्त काळजी आमच्याकडून घेतली जाईल”, असे राज ठाकरे म्हणाले.