साईमत जळगाव प्रतीनिधी
नवविवाहित स्त्रीयांच्या आनंदाला उधाण आणणारा श्रावणातील प्रमुख सण म्हणजे मंगळागौर होय.. आधुनिक जगतात वावरतांनाही मंगळागौरसारखे धार्मिक विधी पार पाडत आधुनिक जगातील सत्यता शब्दबद्ध करुन त्यावर मंगळागौरीचे खेळही उत्साहाने खेळले जातात… असाच एक मंगळागौर सोहळा पार पडला तो व्यावसायाने डॉक्टर असलेल्या गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांच्या कुटूंबात…
नाच गं घुमा कशी मी नाचू…, पोरी पिंगा ग पोरी पिंगा गं… ह्यासारख्या गाण्यांचे बोल आणि विविधरंगी जरी काठापदराच्या साड्या नेसून सोळा-श्रृंगार करत पायी ठेका धरण्याचा मोह महिलावर्गाला आवरला गेला नाही. त्याचे कारणही तसेच काहीसे होते. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील व डॉ.वर्षा पाटील यांचे चिरंजीव डॉ.अनिकेत पाटील व स्नुषा डॉ.अक्षता पाटील यांची पहिली मंगळागौर नुकतीच जळगाव शहरातील कमल पॅराडाईज येथे थाटात पार पडली.
बालपणापासून एकत्र कुटूंबात वाढलेल्या, आई-बाबांबरोबरच आजीच्याही सान्निध्यात मोठ्या झालेल्या डॉ.केतकी पाटील यांनी मोठ्या उत्साहाने आपले भाऊ व भावजयी असलेले डॉ.अनिकेत व डॉ.अक्षता यांच्यासाठी मंगळागौर सोहळा आयोजित केला होता.
सकाळी विधिवतपणे मंगळागौर पूजा झाली. केवळ पूजेपुरतच नव्हे तर ही मंगळागौर कायम स्मरणात राहावी याकरीता पूर्वीच्या मंगळागौरीच्या खेळ व गीतांना आधुनिक युगातील स्वरुपानुसार शब्दबद्ध व संगीत देऊन खेळ देखील खेळण्यात आले. याकरीता पुण्यातील महिला मंडळाला आमंत्रित करण्यात आले होते. यात फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपर्या, बोटी/नावा यांसारखी पारंपरिक खेळ खेळण्यात आले. यात पहिली मंगळागौर असलेल्या डॉ.अक्षतां, डॉ.केतकी यांच्यासह उपस्थीत महिलांना देखील सामावून खेळ खेळण्यात आले. यातून पाटील परिवाराची पुढची पिढी देखील संस्कृती जपण्याचा प्रयत्न करीत आहे. पारंपरिक गोड पदार्थ असलेल्या पुरणपोळीच्या जेवणाने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
संस्कृतीचा ठेवा जपायलाच हवा – डॉ.केतकी पाटील
श्रावण महिन्यात खुप सणवार असतात, आपल्या कुटूंबातील ज्येष्ठ मंडळी वर्षोनुवर्षे ते सणवार तितक्याच आनंदाने पार पाडतात, आपण देखील आपल्या संस्कृतीचा ठेवा जपायलाच हवा, त्यामुळे आपली पिढी देखील या संस्काराची जपणूक करुन त्यांच्यात देखील नात्यांची गुंफण घट्ट राहील आणि संस्कृतीचे जतन होईल असे गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांनी सांगितले.