मनपा निवडणुकीची तयारी वेगात ; सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी
मुंबई (प्रतिनिधी) –
मुंबई महापालिकेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी दिवशीच निवडणुकांच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांना रुजू होण्याचे आदेश दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना केंद्रस्तरीय अधिकारी पदावर रूजू होण्याचेही आदेश दिले आहेत. अन्यथा, कारवाई होऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडसह २३ महापालिकांवर प्रशासकीय राजवट आहे. सर्वच पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. या निवडणुका आणि ओबीसी आरक्षण न्यायप्रविष्ट आहे. राज्यात अनेक ठिकाणी चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील, यावर चर्चा सुरू आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासंदर्भात विनंती न्यायालयाकडे करण्यात आली, ओबीसी आरक्षण असो किंवा नसो; मात्र निवडणुका व्हाव्यात, अशी याचिकाकर्त्यांनी मागणी आहे.
निवडणूक प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था
महापालिका – २९, मुदत संपलेल्या महापालिका – २९, नगरपरिषदा – २४३, मुदत संपलेल्या नगरपरिषदा – २२८, नगरपंचायती – १४२, मुदत संपलेल्या नगरपंचायती – २९, जिल्हा परिषदा – ३४, मुदत संपलेल्या जिल्हा परिषदा – २६,एकूण पंचायत समिती – ३५१, मुदत संपलेल्या पंचायत समिती – २८९.