प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक
मुंबई (प्रतिनिधी)-
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. कोरटकर २५ फेब्रुवारीपासून फरार होता. त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु होता. अखेर पोलिसांना त्याचा सुगावा लागला.
प्रशांत कोरटकर सुरुवातीला नागपुरातून फरार होऊन चंद्रपूरमध्ये लपून बसला होता. नंतर कोल्हापूर पोलिस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहूनही तो फरार झाला होता. प्रशांत कोरटकरला आता एका महिन्यानंतर तेलंगणामधून अटक केल्याची माहिती मिळत आहे.
नोंद केल्यानंतर कोल्हापूर पोलिस त्याला ताब्यात घेतील. यानंतर त्याला महाराष्ट्रात आणले जाईल. इंद्रजीत सावंत यांनी कोरटकर विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे कोरटकरला आता कोल्हापूरला आणण्यात येणार असल्याचे समजते.