मलकापूर : प्रतिनिधी
शहरातील एका शाळेच्या आवारातील टीन पत्र्यांच्या खोलीतून पोलिसांनी दोन ते तीन प्रिंटिंग मशीन ताब्यात घेतल्या आहेत. या मशीन कुख्यात जग्गू डॉनच्या असल्याचे सांगितले जात आहे. या मशीन बनावट नोटा छापण्याच्या असल्याचेही सांगितले जात आहे.
अधिक माहिती अशी की, येथील गणवाडी रोडवरील गुरुद्वाराच्या पाठीमागे एका नेत्याच्या शाळा परिसरात टीनपत्र्याच्या खोलीत दोन ते तीन प्रिंटिंग मशीन आणि ८ते ९ सुटे भाग पोलिसांना आढळून आले. सदरची कारवाई ४ डिसेंबर रोजी रात्री १० सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. या मशीन जग्गू डॉनच्या असल्याचे सांगितले जात असून, पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी या माहितीस दुजोरा दिला आहे. तीन महिन्यांपूर्वी या प्रिंटिंग मशीन श्रीनिवास अपार्टमेंटमध्ये ठेवलेल्या होत्या, अशी माहिती आहे. काही दिवसांनंतर नामदेव नावाच्या मजुराने काही जणांच्या मदतीने श्रीनिवास अपार्टमेंटमधून त्या मशीन गणवडी रोडवरील गुरुद्वारामागील शाळेच्या टीनपत्र्यांच्या गोदामात ठेवल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या मशीन जग्गू डॉनच्या असल्याचे समोर आले आहे. या मशीनचा वापर बनावट नोटा छापण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून जग्गू डॉनने अनेक शेतकऱ्यांना कापूस घेऊन पैसे न देता कोट्यवधी रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी त्याच्यावर महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्येच श्रीरामपूर पोलीस ठाण्यात नकली नोटांसंदर्भात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे पोलिसांनी जप्त- केलेल्या प्रिंटिंग मशीनचा वापर जग्गू डॉन कशासाठी करणार होता? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी मलकापूर – शहरांमध्ये एका नेत्याच्या शाळेच्या परिसरातून पोलिसांनी या मशीन ताब्यात घेतल्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे अनेक मोठ्या नेत्यांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जात
आहे.
