महादेव मंदिरातील चोरीच्या तपासात
पोलिसांनी पाळत ठेवून चोरांना ‘ भोळे’ ठरवले !
भडगाव (प्रतिनिधी )-
भडगाव तालुक्यातील कजगाव येथील महादेव मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी भडगाव पोलिसांनी गुन्हेगारांवर पाळत ठेवून चोरी उघडकीस आणली आहे.
आफिक शेख शरिफ मेहतर उर्फ कैन्टी आणि मिथुनसिंग मायासिंग बावरी यांना अटक करण्यात आली असून, ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२२ फेब्रुवारी रोजी कजगाव येथील महादेव मंदिरात चोरी झाली होती. चोरट्यांनी मंदिरातील १५ हजार रुपयांचे पंचधातूचे वस्त्र, ५ हजार रुपयांचा पंचधातूचा नाग आणि ५ हजार रुपयांचे पंचधातूचे त्रिशूल लंपास केले. २१ मार्च रोजी भास्करनगरमधील महादेव मंदिरात चोरी करून ५,००० रुपयांची रोकड व ३ हजार रुपयांचे एम्प्लिफायर चोरून नेले.
चोरी झाल्यानंतर भडगाव पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींवर लक्ष ठेवले. तपासादरम्यान, संशयित आफिक शेख शरिफ मेहतर उर्फ कैन्टी याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने साथीदाराचे नाव सांगताच, मिथुनसिंग मायासिंग बावरी यालाही अटक करण्यात आली.
अटक केलेल्या दोघांकडून ३००० रुपयांची रोकड आणि एम्प्लिफायर जप्त करण्यात आला. पंचधातूचे वस्त्र, नाग आणि त्रिशूल अज्ञात इसमाला विकल्याची कबुली आरोपींनी दिली. पोलिसांनी विक्रीतून मिळालेली रक्कम जप्त केली आहे.
पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे आणि त्यांच्या पथकाने शिताफीने तपास करून चोरीचा छडा लावला.