रत्नागिरी : वृत्तसंस्था
उदय सामंत फाऊंडेशन व रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित भारतीय आयुर्विमा महामंडळ,इंडियन ऑइल, इन्फिगो आय केअर,ओएनजीसी व पितांबरी प्रायोजित राज्यस्तरीय आमंत्रितांच्या रत्नागिरी कॅरम लीग सिझन ६ मध्ये पालघरच्या यंगस्टरने बाजी मारली.अंतिम फेरीत त्यांनी शिवगर्जना लायन्स संघाला अतिशय अटीतटीच्या सामन्यात २-१ अशी मात करून विजय मिळविला.
यंगस्टरने पहिल्या एकेरीच्या सामन्यात विश्व्विजेत्या संदीप दिवेने शिवगर्जना लायन्सच्या अहमद अली सय्यदवर २५-०, २५-५ अशी सहज मात केली मात्र यंगस्टरच्या अमोल सावर्डेकर व सिद्धांत वाडवलकर जोडीला शिवगर्जना लायन्सच्या रियाझ अकबर अली व महम्मद घुफ्रान विरुद्ध ५-१५, १-२५ असे सहज पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे तिसरा व अंतिम मिश्र दुहेरीचा सामना निर्णायक ठरला. या सामन्यात यंगस्टरच्या जावेद शेख व अंबिका हरिथ जोडीने शिवगर्जना लायन्सच्या प्रफुल मोरे व प्राजक्ता नारायणकर जोडीला ११-१२, १७-८ व १६-१५ असे शेवटच्या बोर्डात हरवून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
जैन सुप्रीमो संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. विजेत्यांना प्रमुख पाहूणे भारतीय आयुर्विमा महामंडळ, रत्नागिरीचे शाखाधिकारी सुशांत देशपांडे, पीतांबरीचे श्रीहरी शौचे, गोवा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष फ्रान्सिस सेराव, सचिव दीनानाथ पिरलेनकर, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार, उपाध्यक्ष यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, योगेश फणसळकर,रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, सचिव मिलिंद साप्ते, खजिनदार नितीन लिमये आदी मान्यवर उपस्थित होते.