हांगझोऊ : वृत्तसंस्था
भारताची स्टार बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेनने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ७५ किलो वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश केला. टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्य जिंकणाऱ्या लवलिनाने यासह पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट मिळवले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत १३ सुवर्ण, २४ रौप्य आणि २५ कांस्य अशी ६२ पदके जिंकली आहेत.
चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत लवलिनाने सेमीफायनलमध्ये थायलंडच्या मानेकोन बॅसनचा ५-० असा पराभव केला. निकहत जरीन, प्रीती आणि परवीन हुडा यांच्यानंतर पॅरिस ऑलिंपिकमध्ये स्थान निश्चित करणारी लवलिना ही चौथी भारतीय बॉक्सर ठरली आहे.
तिरंदाजीतही पदक निश्चित
ओजस प्रवीण देवतळे आणि अभिषेक यांनी पुरुषांच्या तिरंदाजीतील कंपाउंडमध्ये अंतिम फेरीत पोहोचले आहे.त्यामुळे या प्रकारात भारताचे सुवर्ण आणि रौप्यपदक निश्चित झाले आहे.अंतिम फेरी ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे तर महिलांच्या वैयक्तीक कंंपाउंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नमने अंतिम फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केले. तिने भारताच्या अदिती स्वामीचा सेमीफायनलमध्ये पराभव केला. आता ज्योतीचे लक्ष्य सुवर्णपदकावर असेल.
सिंधू-प्रणयची आगेकूच
बॅडमिंटनमध्ये भारताचा स्टार खेळाडू एचएस प्रणय आणि पी.व्ही.सिंधू यांनी प्री क्वॉर्टर फायनलमध्ये प्रवेश केला. प्रणयने मंगोलियाच्या बत्दावा मुंखबातचा २१-९, २१-१२ असा पराभव केला. तर माजी वर्ल्ड चॅम्पियन सिंधूने चीनी तायपैच्या वी चि सूचा २१-१०, २१-१५ असे पराभूत केले.