गर्दी नसल्याने ओबीसी मेळाव्यात भुजबळांसमोर पदाधिकाऱ्यांची आगपाखड

0
25

गर्दी नसल्याने ओबीसी मेळाव्यात भुजबळांसमोर पदाधिकाऱ्यांची आगपाखड

जळगाव ( प्रतिनिधी)-

मंत्रीपदाची संधी न मिळाल्याने जाहीर नाराजी व्यक्त करणारे राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते छगन भुजबळ यांनी अलिकडे पक्ष नेतृत्वाविरोधात मवाळ भूमिका घेतली आहे. मात्र, समता परिषदेकडून ओबीसींचे मेळावे घेऊन प्रभाव पुन्हा सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. जळगावमधील मेळाव्यातूनही भुजबळांनी शक्तिप्रदर्शन केले. परंतु, मेळाव्यास अपेक्षेपेक्षा कमी गर्दी जमल्याने भुजबळांसमोरच पदाधिकाऱ्यांनी आगपाखड केली. मेळाव्यात भुजबळ यांनी केलेल्या मार्गदर्शनापेक्षा ही आगपाखडच चर्चेत राहिली.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे शनिवारी शहरात ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. छगन भुजबळ उपस्थित होते. मेळाव्याच्या ठिकाणी वैयक्तिक भुजबळांच्या प्रभावामुळे जिल्हाभरातून गर्दी अपेक्षित होती. उत्साहात आयोजकांनी आवश्यक तयारी केली होती. प्रत्यक्षात मेळाव्यात म्हणावी तशी गर्दी झालीच नाही. समोर अनेक खुर्च्या रिकाम्या असताना व्यासपीठ मात्र खचाखच भरलेले होते. ते पाहुन खुद्द भुजबळही संतप्त झाले.

बोलण्याची संधी मिळालेल्या दशरथ महाजन यांनी नेमकी दुखरी नस ओळखली आणि छगन भुजबळ यांच्यासमोरच गर्दी कमी झाल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. प्रत्येकाने आपल्याबरोबर दोन-चार कार्यकर्ते आणले असते तर चांगली गर्दी झाली असती. संघटनेमध्ये अनेकांना फक्त पद आणि खुर्ची पाहिजे; काम करायला नको, असे कान टोचत महाजन यांनी चमकोगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भरसभेत टिकास्त्र सोडले. भुजबळांनी थांबण्यास सांगितले, तरीही ते बोलतच राहिले. त्यामुळे नंतर भुजबळांना काय बोलावे आणि काय नाही, असेच झाले !

मेळाव्यात भुजबळ यांनी, मंत्रीपद मिळाले नाही म्हणून नाराज होऊन आता ओबीसींचे मेळावे घेत आहेत, असे काहीजण बोलत असल्याचे सांगितले. आरक्षणासाठी सरकारच्या विरोधातही लढण्याची आपली तयारी आहे. कोणाला काय द्यायचे, ते द्या; परंतु, आमचे आरक्षण कमी करू नका, असेही भुजबळ यांनी नमूद केले. जळगावमधील एकाही प्रभावशाली राजकीय नेत्यांसह लोकप्रतिनिधींनी मेळाव्याला हजेरी लावली नाही. त्याचीही चर्चा होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here