आता सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंतच शहरात अवजड वाहनांना प्रवेश
जळगाव (प्रतिनिधी)-
शहरातून दिवसभर होणारी अवजड वाहनांची वाहतूक डोकेदुखी ठरत आहे. आता सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच शहरातून अवजड वाहनांना प्रवेश राहणार आहे.
अवजड वाहनांना प्रवेशाविषयी काढण्यात आलेल्या अधिसूचनेवर हरकती मागविण्यात आल्या होत्या. सकाळी ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना शहरात बंदी राहणार असल्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. शहरातील काही मार्गावर वाहतूक व्यवस्थेविषयी नियमावली ठरवून दिलेली आहे.
आठ वर्षांपूर्वी काढलेल्या अद्यादेशानुसार बाजारपेठेत मालाची वाहतुक करणाऱ्या वाहनांना सकाळी ११ ते दुपारी ४ व रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत परवानगी देण्यात आली होती. दिवसेंदिवस वाढती वाहनांची संख्या, रहदारी तसेच शाळा परिसर, शासकीय कार्यालय, रेल्वे स्थानक, मुख्य बाजारपेठ, सरकारी व खासगी रुग्णालय, बँका, मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती यांचा विचार करून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यासंदर्भात नवीन अधिसूचना काढली होती व त्यावर हरकती मागविल्या होत्या.
मालवाहू वाहनांसाठी अजिंठा चौक ते नेरी नाका, टॉवर चौक, शिवाजीनगर उड्डाणपूल यामार्गावर सकाळी ९ ते दुपारी ३ तसेच रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेतच मालवाहू वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्याचे नमूद होते. सकाळची प्रस्तावित वेळ बदल करीत अवजड वाहनांसाठी सकाळी दोन तास कमी करून ९ ऐवजी ११ वाजेपासून प्रवेश राहणार आहे.
मात्र नंतर दुपारी प्रस्तावित ३ वाजेऐवजी ४ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. रात्रीच्या प्रस्तावित ९ ते सकाळी ६ या वेळेत कोणताही बदल न करता ती वेळ कायम ठेवली आहे. सकाळी शाळा, महाविद्यालय, बँका व इतर कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्यांची १० वाजेनंतरही वर्दळ असते, असे मुद्दे हरकतींच्या माध्यमातून मांडण्यात आले. त्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी कायम ठेवली आहे.
सकाळची वेळ कमी केल्याने व दुपारी एक वाजेपासून एक ते दोन तास बाजारपेठेत जेवणाची वेळ असल्याने ११ ते दुपारी ३ एवढ्या कमी वेळेत मालाची वाहतुक करणे शक्य होणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी हरकतीद्वारे सांगितले. त्यामुळे दुपारी ३ ऐवजी ४ वाजेपर्यंत अवजड वाहनांना एक तास वाढवून देण्यात आला.