नवी दिल्ली : वृत्तसंस्था
‘जगातील कुठलाही प्रशिक्षक वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसारखा कलाकार घडवू शकत नाही,’ अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी शमीचे कौतुक केले आहे.
वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत शमीने सात सामन्यांत सर्वाधिक २४ विकेट घेतल्या होत्या. तो भारताचा वन-डे आणि कसोटीतील प्रमुख गोलंदाज झाला आहे. आपल्या पडत्या काळात म्हांब्रे यांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचा उल्लेख शमीने आवर्जून केला आहे.त्याचबरोबर वर्ल्ड कपमध्ये विकेट घेतल्यानंतर तो डोक्यावर चेंडू घासून म्हांब्रे यांना यशाचे श्रेय देत होता. मात्र, शमीच्या यशात आपला काहीच वाटा नसल्याचे म्हांब्रे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सांगितले.
शमीसारखा दुसरा गुणवान गोलंदाज भारताला मिळेल का, या प्रश्नावर म्हांब्रे म्हणाले, प्रशिक्षक शमीसारखे गोलंदाज घडवितात, असे मी म्हटले तर ते साफ खोटे आहे. सातत्याने सीमवर चेंडू टाकणे जमायला लागले, तर जगातील प्रत्येक गोलंदाज शमी होईल. शमीने मेहनतीच्या जोरावर ही कला अवगत केली आहे. सातत्याने सीमवर एकापाठोपाठ एक चेंडू टाकणे, तेदेखील मनगटाचा उत्तम वापर करून चेंडू दोन्ही बाजूंनी वळवण्याची कला दुर्मीळ आहे. अनेक गोलंदाजांनी असे प्रयत्न करून बघितले. मात्र, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर अनेकांचा चेंडू वळतच नाही. तो सरळ जातो.’